आगाराचा डोलारा भंगार गाड्यांच्या आधारे
By Admin | Updated: December 1, 2014 22:59 IST2014-12-01T22:59:42+5:302014-12-01T22:59:42+5:30
येथील आगारात समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव आगारात भंगार गाड्यांची संख्या अधिक आहे.

आगाराचा डोलारा भंगार गाड्यांच्या आधारे
तळेगाव (श्याम.पंत) : येथील आगारात समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव आगारात भंगार गाड्यांची संख्या अधिक आहे. शिवाया आगार प्रशासनातील महत्त्वाची सहा पदे रिक्त आहे. यामुळे सेवा व सुविधा देण्यात आगार व्यवस्थापन अपयशी ठरत असल्याचा प्रत्यय प्रवाशांना वारंवार येतो.
येथील आगारात सुस्थितीतील बस गाड्यांची मागणी व रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी प्रवाशी सातत्याने करीत आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. आगारात चालक व वाहकांची संख्या समाधानकारक असली तरी रिक्त पदांमुळे इतर प्रशासन दुर्लक्षित आहे.
आगार व्यवस्थापनाला रिक्त पदांमुळे महत्त्वाचे कामे नाईलाजास्तव अप्रशिक्षित कामगारांकडून करुन घ्यावी लागत आहे. याचा दुष्परिणाम आगाराच्या वाहतूक सेवेवर होत आहे. गाड्यांचे वेळापत्रक नसणे, गाड्यांचे ब्रेक डाऊन वारंवार होणे, यामुळे प्रवाशी त्रस्त आहे.
रिक्त पदांमुळे वाहन परिक्षकाचे एक पद, लिपिकाचे एक तर सर्वात महत्त्वाच्या यांत्रिक विभागातील चार पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या सर्व रिक्त पदांमुळे आगाराचे कामकाज अक्षरश: विस्कळीत झाले. यांत्रिकी विभागात कर्मचारी कमी असल्यामुळे याठिकाणी चालकांना कामावर लावून गाड्यांच्या दुरुस्त्या करुन घेतल्या जात असल्याचे चित्र पहायला मिळते. यांत्रिक विभागातील महत्त्वाचे वाहन परिक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे आगारातील गाड्या परीक्षणाविनाच रस्त्यावर धावत आहेत.
भंगार गाडीमुळे गंभीर अपघाताची घटना घडली आहे. यामुळे भविष्यात सुरळी फाट्यावरील अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात घालुन याप्रकारे वाहन रस्त्यावरुन पळविणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो.
पद रिक्ततेमुळे अन्य कर्मचारी या कामात व्यस्त होतात. लिपिकाचे पद रिक्त असल्याने ते काम वाहकांकडून करुन घेतले जाते. वाहतूक नियंत्रक व प्रमुखांची देखील पदे रिक्त असल्याने आगारातील वाहतूक व्यवस्था काही विस्कळीत झाली आहे. यामुळे ठराविक कर्मचाऱ्यांवर कामाचा जादा ताण येत असल्यामुळे कर्मचारी अधिका काळ रजेवर असतात. या सर्व बाबीचा ताण आगार व्यवस्थापनावर पडत असून याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)