आरोग्य विभाग टाकतेय कात; करण्यासाठी कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:24+5:30
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील वर्षी कोविड विलगीकरणासाठी दहा बेड होते. पण, आता तीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी एक व्हेंटिलेटर होते मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये सहाची भर पडली असून त्याची संख्या आठ झाली आहे.

आरोग्य विभाग टाकतेय कात; करण्यासाठी कोरोनावर मात
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आर्वी तालुक्यातील हिवरातांडा या गावात आढळून येताच जिल्हा प्रशासनाचे लक्ष या तालुक्याकडे लागले होते. या तालुक्यापासूनच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिकगती देण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटीपेक्षा दुसऱ्या लाटीने चांगलेच थैमान घातल्याने दुर्लक्षित असलेली आरोग्य यंत्रणाही सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला. आता तिसऱ्या लाटीची शक्यता वर्तविली जात असल्याने ती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळ देण्याचे काम सुरु आहे.
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील वर्षी कोविड विलगीकरणासाठी दहा बेड होते. पण, आता तीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी एक व्हेंटिलेटर होते मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये सहाची भर पडली असून त्याची संख्या आठ झाली आहे. पहिल्या लाटीत रुग्णाच्या विलगीकरणासाठी हैबतपूर आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ८० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. आता रुग्ण गृहविलगीकरणात अधिक असल्याने तेथे वीस बेडचीच व्यवस्था आहे. विशेषत: पूर्वी आरोग्य सेवा देण्यासाठी आठ डॉक्टर ४७ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ होते. त्यात पाच कंत्राटी डॉक्टर आणि ९ आरोग्य कर्मचाऱ्यांची भर पडली असून सध्या ५६ मनुष्यबळ आरोग्य सेवेत आहे. ग्रामीण भागातील जळगाव, रोहणा व खरांगणा या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितर जैसे थेच असून केवळ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची वाढ झाली आहेत.
आता काय असणार व्यवस्था
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुसज्ज कोविड हॉस्पिटल सुरु होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर तेथे हलविण्यात येणार असून रेमिडीसर ऑक्सिजन, आरटीपीसीआर चाचणी, अॅन्टिजेन चाचणी यासह इतर रक्त तपासण्या त्या ठिकाणी होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात फक्त नॉन कोविड सेंटर राहणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिली.
यासोबतच आर्वीमध्ये कोरोनावर उपचार करण्याकरिता खासगी रुग्णालयही सुुरु करण्यात आले असून हे रुग्णालयही याकरिता मदतगार ठरणार आहे. यासोबतच रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या विलगीकरणाकरिता कोविड केअर सेंटरचीही व्यवस्था करण्यासाठी प्रशासन पूर्णत: तयारीमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णासाठी यंत्रणा उभी होत असल्याचे दिसून येत आहे.