साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:20+5:30

शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे.

Dengue victims in Sainagar | साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

Next
ठळक मुद्देपालिका प्रशासनाह आरोग्य विभाग सुस्त : नागरिकांचा रोष, मृत बँक व्यवस्थापक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बदलत्या वातावरणामुळे आणि शहरात ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे आजारांनी डोके वर काढले आहे. अशातच डेंग्यूचा आजारही पाय पसरत असताना उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असतानाच साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा डेंग्यूने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साईनगरातील नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे. अशा स्थितीत नगर पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात धुरळणी करणे आवश्यक आहे.मात्र नगरपालिकेतील अधिकारी वर्ग रजेवर असून पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने शहरात आजाराचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणाही कागदोपत्री आकडेमोड करण्यात व्यस्त असून घटना घडल्यावर किंवा ओरड झाल्यावरच घटनास्थळी पोहोचून वरातीमागून घोडे दामटवित आहे. आरोग्य यंत्रणा व नगरपालिकेच्या या निष्क्रीयतेमुळे साईनगरातील अतुल जिन्नेवार यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत अतुल जिन्नेवार हे वर्धा नागरी बँकेच्या गांधीनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दिवाळीपूर्वी ते आजारी पडल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यूचे निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. पण, तरीही आराम पडला नाही. यातच काविळनेही जोर केल्यामुळे त्यांना सावंगी आणि तेथून नागपुरला हलविण्यात आले. गुरुवारी उपचारादरम्यान रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कार्यतत्परता आणि सुस्वभावीवृत्तीमुळे सर्वपरिचित असल्याने ही दु:खद बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डेंग्यूसदृश आजाराचीच नोंद
तापाने फणफणत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खासगी रुग्णायलातील तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निदान करुन डॉक्टर उपचार सुरु करतात.पण; आरोग्य विभागाकडे डेंग्यू नाही तर डेंग्यू सदृश्य आजाराचीच नोंद होत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४० डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साईनगर परिसरातील घटना कळल्याबरोबर आरोग्य विभागाची चमू त्या परिसरात पोहोचली. तेथील पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य यंत्रणाही लक्ष ठेऊन आहे. कुणालाही ताप आल्यास त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वेळीच उपचार घ्यावा.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा आकस्मिक मृत्यू मनाला चटका लावून गेला. आरोग्य यंत्रणा आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. हा प्रभाग मोठा असून या ठिकाणी मोकळ्या जागाही भरपूर आहे. त्यामुळे या परिसरात धुरळणी करणे आवश्यक असल्याने तशी मागणी पालिकेकडे करण्यात आली.परंतु कर्मचाºयांची कमतरता आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हालाही काम करताना अडचणीचे जात आहे.
- प्रदीप ठाकरे, नगरसेवक, साईनगर.

Web Title: Dengue victims in Sainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.