तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
By Admin | Updated: September 2, 2014 23:59 IST2014-09-02T23:59:07+5:302014-09-02T23:59:07+5:30
तालुक्यात सध्या डेंग्यूच्या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रोगाचे निदान करण्याकरिता रक्त तपासणी यंत्र फक्त जिल्हास्तरावर

तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
आर्वी : तालुक्यात सध्या डेंग्यूच्या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रोगाचे निदान करण्याकरिता रक्त तपासणी यंत्र फक्त जिल्हास्तरावर असल्याने रक्ताचा अहवाल बराच विलंबाने येतो. याचा त्रास सर्वसामान्यांना होतो. वेळीच रोगाचा पत्ता लागत नसल्याने औषधोपचार करणे शक्य होत नाही. रक्ततपासणीची ही मशीन तालुकास्तरावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
साडेतीन लाख रुपये किमतीची ही मशीन तालुकास्तरावर नसल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले जात असून यातून डासांचे प्रमाण वाढत आहे. यात डेंग्यूची लागण करणाऱ्या डासांचीही उत्पत्ती होत आहे. यामुळे तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. या आजारात रुग्णाच्या रक्तातील जीवनावश्यक घटक कमी होत असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
सर्दी, ताप, खोकला हे या आजाराचे प्राथमिक स्वरुप आहे. रुग्ण रुग्णालयात गेला तर त्याला या आजारावर औषध दिले जाते. यात दोन ते तीन दिवस निघून जातात. रुग्णाला आराम न पडल्यास त्याला रक्तचाचणी करायला सांगितली जाते. यात त्याच्यावर आर्थिक भुर्दंड बसतो. कम्प्लीट ब्लड काऊंट मशीन (सीबीसी) सध्या जिल्हास्तरावरच उपलब्ध आहे. या मशीनची किंमत साडेतीन लाख रुपये असून ही मशीन उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपलब्ध करून देण्यास आल्यास आजाराचे निदान लवकर होऊन लगेच उपचार सुरू होऊ शकतो. या मशीनसाठी एनएस-वन, ही किट वापरली जाते. त्याकरिता दोन थेंब रक्त टाकून तपासणी होते. नंतर व्हायरस कन्फर्मेशनकरिता नागपूरला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जाते. होणारा विलंब रुग्णाच्या जीवावर उठणारा आहे.(तालुका प्रतिनिधी)