नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहरात डेंग्यूचे थैमान
By Admin | Updated: September 9, 2014 00:33 IST2014-09-09T00:33:15+5:302014-09-09T00:33:15+5:30
शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा

नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहरात डेंग्यूचे थैमान
दोघांचा मृत्यू : पाच बालकांवर उपचार सुरू
पुलगाव : शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा पाच बालकांना या रोगाची लागण झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संदर्भात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना पूर्व सूचना देऊनही निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांत संताप आहे.
आतापर्यंत नेहा धनाडे (८) व पलाश बन्सोड (१०) या दोन बालकाचा मृत्यू झाला. तर प्रांजल पुरूषोत्तम टेंभुर्णे (१४) हिला नागपूरला हलविण्यात आले आहे. शरन्य निलेश बोदेले हिला सावंगी (मेघे) येथील रुग्णालात दाखल करण्यात आले. खुशी जितेंद्र टेंभुर्णे, अनुष्का सचिन जनबंधु, स्वरा मनीष गोटे यांच्याववर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयातही रुग्ण संख्या वाढीवर आहे.
डेंग्यूसदृश रोगाचा प्रकोप होत असताना नगरपरिषद प्रशासन या बाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बसपाद्वारे नगरपरिषदेवर मोर्चा नेवून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते गैरहजर असल्याने नागरिकात संताप आहे. या प्रकरणी तातडीने उपाय योजना करण्यात आल्या नाही तर पुलगाव बंद करण्यात येईल, असा ईशारा कुंदन जांभुळकर, विनोद बोरकर, सोनू मेंढे, स्रेहल अंबादे, ईश्वर ठोंबरे, सुभाष रामटेके, सदानंद टेंभुरकर, दीपक ढोणे, विठ्ठल वाघमारे, प्रकाश टेंभुर्णे, उत्तम चव्हाण, धर्मपाल गायकवाड यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)