महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By Admin | Updated: October 18, 2015 02:28 IST2015-10-18T02:28:28+5:302015-10-18T02:28:28+5:30
वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. कामगारांनाही जगणे कठीण झाले आहे.

महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
मनसेचे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
वर्धा : वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. कामगारांनाही जगणे कठीण झाले आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करीत निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना महागाई विरोधात निवेदन सादर केले.
महागाई दिवसागणिक वाढत आहे. यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब जनतेने काय खावे व काय नाही, हा प्रश्नच आहे. या शासनाने जनतेला ‘अच्छे दिन आणे वाले है’, अशी आशा दाखविली होती; पण ‘अच्छे दिन कुणाचे’ हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आता सणांचे दिवस सुरू झाले आहे. यात तुरीच्या डाळीचे भाव गगणाला भिडले आहेत. शिवाय दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, धान्य, किराणा यांच्या किमतीही वाढल्या आहेत. या वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना मनसे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, दीपक गेडाम, शहर अध्यक्ष श्याम परसोडकर, धर्मा भोयर, घनश्याम बनाकर, गोविंद राऊत, धिरज चनेकार, शुभम जळगावकर, राहुल देवळीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)