निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबितच
By Admin | Updated: December 14, 2015 02:02 IST2015-12-14T02:02:19+5:302015-12-14T02:02:19+5:30
निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक आंदोलने करून न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.

निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबितच
आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक आंदोलने करून न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवाभरती नियमांतर्गत शासकीय व निमशासकीय नोकरीत आरक्षण देऊन नियुक्त्या देण्यात याव्या, अन्यथा नोकरीला पर्याय म्हणून २५ लाखांचा मोबदला द्यावा, सर्व प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता द्यावा, वयोमर्यादा पार केलेल्या प्रकल्पग्रस्तांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांचा नोकरीचा हक्क वळता करावा, जिल्हा न्यायालयातून निर्णय झालेल्या भूसंपादन प्रकरणातील दावे उच्च न्यायालयात अपिलाच्या नावावर रेंगाळत न ठेवता नुकसान भरपाई त्वरित द्यावी, मुद्रा पंतप्रधान योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, औरंगाबाद खंडपीठाचा प्रकल्पग्रस्तांसाठीचा सरळ सेवा भरतीचा नोकरीच्या संदर्भातील निर्णय नव्याने कायम करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना लेव्ही जमिनीचे त्वरित वाटप करावे या व अन्य मागण्याही प्रलंबित आहे. मागण्यांच्या पुर्ततेसाठी आंदोलने झाली. प्रकल्पग्रस्तांनी विष घेतले; पण समस्या निकाली निघाल्या नाही. आता निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त नागरिक नागपूर येथे आमरण उपोषण करीत आहेत. राज शिरगरे, धर्मेंद्र राऊत, दया पाटील, रवी खंडारे, भोजराज भोवरे, दिनेश डेहनकर, राजू कदम, शैलेश तलवारे, रज्जाक अली, नीलेश गायकवाड, विलास डोंगरे, रोशन राऊत, निखिल कडू, गौतम काळे, नितीन शेंडे, हेमराज कडू, सुशील काळे हे प्रकल्पग्रस्त सोमवारी उपोषण सुरू करतील.(तालुका प्रतिनिधी)