लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील आगाराला नवीन दहा 'लालपरी' बस मिळाल्या आहेत. त्यामुळे भाविक भक्तांचा ओढा दर्शनासाठी तसेच पर्यटक व प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे. यामुळे आर्वी - रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांनी केली आहे.
आर्वी ते नागपूर बससेवा उपलब्ध आहे. रामटेक, खिंडसी, कामठी आदी इतर ठिकाणी जायचे असल्यास नागपूर येथे उतरावे लागते. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक ज्येष्ठ महिला तसेच पर्यटक प्रवासी यांना त्रास सहन करावा लागतो. ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी मित्र यांनी केली होती. परंतु, ही मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. बसेस नसल्याचा कांगावा करण्यात आला होता. मात्र, आता नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आर्वी रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे याची दखल घेत बससेवा सुरु करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष देत तत्काळ बससेवा करण्याची नितांत गरज आहे.
रामटेक भाविकांचे श्रद्धास्थानरामटेक हे निसर्गरम्य प्रदेशात वसलेले अप्रतिम स्थान आहे. विदर्भातील हिंदू धर्मीयांचे पवित्र धार्मिक स्थळ असून, पुराणकथा इतिहास व निसर्ग यांचा अद्वितीय संगम घडवते. रामटेक टेकडीवर भगवान राम यांचे मंदिर आहे. वनवासत असताना श्रीराम या टेकडीवर वास्तव्यास होते. त्यानंतर प्रभू श्रीराम यांनी येथे दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. रामटेक गड मंदिरासाठी आणि मेघदूत लिहिणाऱ्या कालिदास यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय रमणीय असे खिंडसी तलाव हा पर्यटकांचे आकर्षक आहे. जलक्रीडा व बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आर्वी- रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या बाबीकडे खासदार, दोन्ही आमदार व परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांची आहे.
"आम्ही प्रवासी मित्रांनी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले. त्यामुळे भाविक भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे."- सुरेश मोटवानी, प्रवासी मित्र
"कुटुंबासाठी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहलीला नेण्यासाठी रामटेक, खिंडसी हे अतिशय चांगले ठिकाण आहे. आर्वीवरून त्यासाठी आर्वी-रामटेक बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी. बसफेरी नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे."- मनोज राऊत, प्राचार्य विस्डन कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी