पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाची मागणी
By Admin | Updated: August 6, 2014 23:59 IST2014-08-06T23:59:44+5:302014-08-06T23:59:44+5:30
पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे

पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाची मागणी
वर्धा : पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे अर्थसंकल्पात समावेश करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, पुलगाव हे मध्यरेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. पुलगावला आशिया खंडातील सगळ्या मोठा किरकोळ आयुधाचा साठा असतो. तसाच डेपो आमला(म.प्र.) येथे आहे. या दोन्ही स्थानाचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व आहे. पुलगाव येथे मोठ्या लाईनची मागणी जुनीच आहे. १९९७ मध्ये या मागणीचा विचार झाला, परंतु तत्कालीन संसद सदस्यांनी याचा पाठपुरावा न केल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. हे देखील निवेदनातून रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पुलगाव आर्वी रेल्वे मार्ग इंग्रजांच्या काळापासून होता. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात ही जागा गेली. त्यानंतर ही रेल्वे सुरू करण्याकरिता रोहणा परिसरातील जनतेने आंदोलन केले. परंतु त्याची दखल रेल्वे विभागाने घेतली नाही. हा मार्ग पुलगाव, आर्वी, तळेगाव, आष्टी, थार, बोटोणा, पार्डी, नारा, वाघोडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल असा असावा, अशी मागणी माजी खासदार विजय मुडे यांनी केली आहे.
(शहर प्रतिनिधी)