नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची मागणी
By Admin | Updated: February 16, 2017 01:26 IST2017-02-16T01:26:43+5:302017-02-16T01:26:43+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे.

नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची मागणी
व्यापाऱ्यांकडून लूट : अल्प भावात होते तुरीची खरेदी
देवळी/कोळोणा (चोरे) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे. परिसरातील शेतकरीही येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. व्यापारी तुरीची अल्प भावात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यामुळे देवळी येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी कोळोणा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तूर काढणीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी तूर विक्रीला आणत आहे. देवळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. देवळी शहर ग्रामीण भागाशी जुळलेले असल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल माल येथे विक्रीला आणणे परवडतो; पण नाफेडची खरेदी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ वा कळंब या ठिकाणी घेवून जावे लागते. या दूरच्या ठिकाणी माल घेऊन जाताना वाहतुकीचा दामदुप्पट खर्च करावा लागतो. पहिल्या दिवशी लिलाव न मिळाल्यास मुक्काम करावा लागतो. परिणामी, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देवळी शहरात व्यापाऱ्यांना तुरी विकल्यास अल्प भाव मिळतो. शेतकऱ्यांची आर्थिकता सावरायची असेल तर शासनाने तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो. शिवाय व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या भाव पाडण्याच्या प्रक्रियेलाही लगाम बसेल. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष देत नाफेडची तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी नरेश ओंकार, नंदू भस्मे, प्रशांत मुनेश्वर, रवींद्र उपाशे, नितीन मानकर, गजानन मोडक, पद्माकर कांबळे, धम्मा कांबळे आदींनी केली.(प्रतिनिधी/वार्ताहर)