तेली समाजाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले
By Admin | Updated: December 19, 2015 02:02 IST2015-12-19T02:02:31+5:302015-12-19T02:02:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे अखिल भारतीय तेली साहू महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष वर्धेचे खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात ...

तेली समाजाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले
रामदास तडस : माता कर्माबाई स्मृत्यर्थ डाक तिकिटाची मागणी
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे अखिल भारतीय तेली साहू महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष वर्धेचे खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात तेली समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतली. यावेळी तेली समाजाला तिसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासह माता कर्माबाई स्मृतीनिमित्त डाक तिकीट सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी यावर सकारात्मक उत्तर दिले असून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. तसेच अखिल भारतीय तेली साहू महासभाद्वारा रामलीला मैदानावर आयोजित रॅलीला उपस्थित राहणार, असे आश्वासन दिले, अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
शिष्टमंडळात अखिल भारतीय तेली समाज साहू महासभेचे अध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर, आसामचे खा. रामेश्वर तेली, छत्तीसगडचे खासदार लखनलाल साहू व खासदार चंदूलाल शाहू उपस्थित होते. तेली समाजाची हा संपूर्ण भारतात एकूण १२ कोटी लोकसंख्या आहे. समाजाला विभिन्न राज्यात नावाने ओळखल्या जाते. तेली समाज राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे. बिहार राज्यामध्ये तेली समाजाला अति मागासवर्गीय श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. परंतु इतर राज्यामध्ये तेली या समाजाला बिहारसारखे प्राधान्य दिल्या जात नाही.
भारत सरकारकडून ज्या प्रमाणात नोकरीमध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे. त्या प्रमाणात मिळत नाही. करिता तेली समाजाला तिसरी सुचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली. इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाची जनगणना करणे गरजेचे आहे.
यास समाजाची जनगणना करण्यात यावी, याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. १९९४ मध्ये सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला संपूर्ण ओबीसी समाजाचे संपूर्ण विवरण मागण्यात आले होते. त्यावर २०११ ला जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन भारत सरकारने दिलेले होते. परंतु अजुनपर्यंत ओबीसी जनगणना करण्यात आलेली नाही. सर्व ओबीसी समाजाची जनगणना करण्याबाबत निर्णय करण्याची विनंतीही करण्यात आली.(जिल्हा प्रतिनिधी)