पक्षीसप्ताह घोषित करण्यासाठी शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 13:36 IST2020-01-18T13:35:55+5:302020-01-18T13:36:34+5:30
वर्ध्याहून रेवदंडामार्गे मुंबई असा तब्बल साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षिमित्र सायकलस्वारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना निवेदन दिले.

पक्षीसप्ताह घोषित करण्यासाठी शासनाला साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्याहून रेवदंडामार्गे मुंबई असा तब्बल साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षिमित्र सायकलस्वारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना निवेदन दिले. निवेदनातून ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह घोषित करण्याची मागणी केली आहे.
रेवदंडा (अलिबाग) येथे नुकतेच ३३ वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानिमित्ताने पर्यावरणपूरक सायकल हे पक्षिमित्रांचे वाहन व्हावे, हा संदेश देण्याकरिता बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे सदस्य दीपक गुढेकर व दर्शन दुधाने यांनी ही सायकल यात्रा काढली होती. वर्ध्यापासून सुरू झालेली ही सायकल रॅली कारंजा लाड, मालेगाव, लोणार, औरंगाबाद, अहमदनगर, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, गागोदे, पेण, अलिबाग असे मार्गक्रमण करीत रेवदंड्याला संमेलनस्थळी दाखल झाली. यादरम्यान सायकल रॅलीत नाशिक येथून अशोक काळे, मुंबई येथून जे. पी. शेट्टी, अलिबाग येथून विनायक डुकरे व प्रशांत पवार सहभागी झाले होते. संमेलनस्थळी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे, माजी संमेलनाध्यक्ष किशोर रिठे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संमेलन संयोजक रूपाली मढवी यांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. संमेलनानंतर बहार नेचर फाऊंडेशनचे चार सायकलस्वार रेवदंडा, अलिबाग, रेवास असा प्रवास करीत मुंबईला मंत्रालयात पोहोचली. महाराष्ट्रातील पक्षिमित्र, पक्षिअभ्यासक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह साजरा करतात. शासनानेही याला मान्यता द्यावी व शासकीय स्तरावर हा कालावधी पक्षीसप्ताह म्हणून अधिकृतरित्या घोषित करावा. त्यामुळे पक्षी व त्यांचे अधिवास याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, अशी भूमिका या सायकलस्वारांनी प्रधान सचिवांपुढे मांडली. पक्षिमित्रांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले. बहारच्या या सायकलस्वारांचे अभिनंदन करून हा विषय कामकाजात घेण्याची ग्वाही प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली. यावेळी विधानभवन उपसचिव एन. आर. थिटे उपस्थित होते.