दातृत्व ही मानवास मिळालेली अनमोल देणगी
By Admin | Updated: February 7, 2015 23:30 IST2015-02-07T23:30:13+5:302015-02-07T23:30:13+5:30
कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु

दातृत्व ही मानवास मिळालेली अनमोल देणगी
सुवीरसागर महाराज : श्रीमद ज्ञानामृत कथमालेचे दुसरे पुष्प
पुलगाव : कुठल्याच परतफेडीची, फळाची अपेक्षा न करता आपल्याजवळ असणारी संपत्ती सढळ हाताने दान करून भुकेल्यास अन्नदानासाठी, अनाथांना आश्रय देण्यासाठी, दुसऱ्याचे अश्रु पुसून त्यांच्या वेदना टिपण्यासाठी सत्कारणी लावणे ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. कारण दातृत्वगुण ही मानवास मिळालेली अनमोल देणगी होय असे मौलिक विचार मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी पुलगाव येथील श्रीमद् ज्ञानामृत कथामालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले.
बुंदेलखंड येथील बरेठी या गावातील जयंतीमाता व शिवचंद या दाम्पत्यांचे पुत्र असणारे सुवीरसागर यांना दहा वर्षापूर्वी मुंबई येथे आचार्य सन्मती सागर महाराजांनी जैन धर्माची मुनीदीक्षा दिली. अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीरांचा ‘जिओ और जिने दो’ संदेश संपूर्ण जगभर पोहचविण्याचा संकल्प करून सर्वधर्मसमभाव, अहिंसा व शांती हे क्रांतीकारी विचार मुनीश्री आपल्या बोधामृत रसपानातून करीत आहे. यांच्या प्रवचनाला शहरातील सर्वत्र सामाजिक स्तरातून उत्स्फूत प्रतिसाद मिळत आहे.
‘कर भला तो हो भला’ या विषयावर प्रवचनाचे द्वितीय पुष्प गुंफताना अकबर बिरबलाच्या एका कथेचा संदर्भ देवून दान व दातृत्वाबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले व बादशाहाच्या नवरत्न दरबारातील बिरबल हा जैन समाजाचा महामंत्री असल्याचे सांगितले. आजची बालके ही राष्ट्राचे भावी कर्णधार असून मुलांचे पालनपोषण करीत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार करणे पालकांचे कर्तव्य आहे.
आई ही जगातील सर्वात अनमोल भेट असून प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतला आहे. आई हा आपला प्रथम गुरू असतो. देवालयातील परमेश्वराच्या चंदनापेक्षाही आईच्या पावलांची धूळ मस्तकी लावणारा अधिक भाग्यवान असतो. कुणाचेही चांगले होईल असेच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दररोज सायंकाळी ६.३० वाजता कथास्थळावर संदीप जैन याच्या संगीत आनंदयात्रेचा नागरिक लाभ घेत आहे. महाआरती शरदचंद्र अवथनकर, सुरेश हनमंते, शास्त्रभेट बदनोरे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)