आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात दुष्काळ घोषित करा
By Admin | Updated: December 4, 2014 23:14 IST2014-12-04T23:14:42+5:302014-12-04T23:14:42+5:30
उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़

आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात दुष्काळ घोषित करा
आर्वी : उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़ यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा हे तीनही तालुके दृष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी आमदार अमर काळे यांनी केली आहे़
शेतपिकांची आणेवारी ५० पैशांच्या आत दाखवावी, कापसाचे भाव वाढवून देण्यात यावे, सोयाबीन उत्पादकांना योग्य भाव मिळावा, उपविभागात वाढता वन्य प्राण्यांचा त्रास दूर करण्यासाठी कायम उपाययोजना करावी, प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना व्यवसायासाठी एक रकमी मोबदला द्यावा, सिंचन विहिरीचे अनुदान त्वरित द्यावे आदी मागण्या आमदार अमर काळे यांनी केल्या आहेत़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ शेतकरी दुष्काळात होरपळत आहे.
आर्वी तालुका व उपविभागातील आष्टी व कारंजा तालुक्यातील नापिकी व उत्पादन झाले नसताना महसूल विभागाच्या सर्व्हेमध्ये अनेक गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर दाखविण्यात आली आहे़ हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी न करता ते शेतातच जनावरांसाठी सोडून दिले. एकरी एक ते दोन पोते उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. कपाशी पीक आणेवारी अद्याप निश्चित व्हायची असल्याने आर्वी उपविभागातील सर्वच गावांचा ५० पैशाच्या आतील आणेवारीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गत तीन वर्षांत आर्वी उपविभागात नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बेजार झाला आहे. शेतपिकांना वन्य प्राण्यांचा अतोनात त्रास आहे़ या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)