मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 30, 2016 01:44 IST2016-05-30T01:44:43+5:302016-05-30T01:44:43+5:30
मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली.

मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू
अंतरगाव येथील घटना : गोठा जाळल्याने घडला अनर्थ
समुद्रपूर/गिरड : मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. यामुळे चुलत भाऊ व त्यांच्या मुलाने संतापून या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. कवडू नारायण चाफले (४५) रा. अंतरगाव असे मृतकाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्याचे नाव विठ्ठल चाफले, रामभाऊ चाफले व सचिन चाफले रा. अंतरगाव असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून विठ्ठल, रामभाऊ व सचिन चाफले या तिघांवर भादंविच्या कलम ३०२, २०१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गिरड पोलीस करीत आहेत.
पोलीस सुत्रानुसार, कवडू चाफले याच्याकडे १३ एकर शेती होती; पण त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने तो इतरांना त्रास देत होता. यामुळे गावात त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याचा हाच त्रास पत्नी निर्मला हिला होत असल्याने गत तीन महिन्यांपासून ती मुलगी व मुलाला घेवून माहेरी हळदगाव येथे गेली होती. यामुळे गावात एकटाच राहत असल्याने त्याचा त्रास वाढला होता. अशात शेतातील त्याची जनावरे मृतावस्थेत दिसल्याने त्याने गावाला लागून असलेला त्याचा चुलत भाऊ विठ्ठल चाफले याच्या गोठ्याला आग लावली. या आगीत गोठ्यामधील स्प्रिंकलर पाईप सेट, इंजिनसह संपूर्ण शेती साहित्य खाक झाले. यात त्याचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
ही आग कवडूने लावल्याचे कळताच विठ्ठल, त्याचा भाऊ रामभाऊ, मुलगा सचिन व काही नागरिकांनी शोधून त्याला मारहाण केली. मारहाण करून त्याला गोठ्याजवळ आणले. घटनेची माहिती गिरड पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी कवडूला त्वरित समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
कवडूविरोधात आठवड्यापूर्वीच पोलिसांत तक्रार
कवडू चाफले याच्याकडून त्रास वाढत असल्याने त्याची तक्रार विठ्ठल चाफले याने आठ दिवसांपूर्वीच पोलिसांत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर या प्रकरणी भादंविच्या ४३५ अन्वये गुन्हाही दाखल आहे. गावातील एक सद्गृहस्थ म्हणून विठ्ठलची ओळख असल्याचे गावकरी बोलत आहेत. कवडू मनोरुग्ण असून विठ्ठलच १५ वर्षांपासून त्याच्यावर औषधोपचार करीत असल्याची माहिती आहे.