दिवसाही होतेय रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:48 IST2018-01-18T21:47:39+5:302018-01-18T21:48:08+5:30
घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

दिवसाही होतेय रेतीची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय टेकोडाचे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी तक्रारही केली आहे.
यंदा आष्टी तालुक्यात इस्माइलपूर या एकाच रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्याला लागून अमरावती जिल्ह्यातील जावरा रेतीघाट लिलाव झाला असून घाट सुरूही झाला आहे. बांधकामे झपाट्याने सुरू असल्याने रेतीघाट धारकांनी एक रॉयल्टी देत त्यावर चार वेळा रेतीची वाहतूक करण्याची अट घालण्यात आली आहे. प्रती ट्रीप ३ हजार ५०० रुपये दर आकारण्यात आले आहेत. परिणामी, रेतीची तस्करी बिनदिक्कत दिवसरात्र सुरू आहे. तहसील कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. रेतीची चोरी पकडण्यासाठी भारसवाडा येथील तलाठ्याने सक्तीची रॉयल्टी तपासणी सुरू केली होती; पण या कर्तव्यदक्ष कर्मचाºयाला वरिष्ठ अधिकाºयांनी रॉयल्टी तपासू नका, घाटधारकावर मेहरबानी करा, असा उपटसुंभ सल्ला दिला आहे. यामुळे प्रशासन एवढे मेहरबान कसे, हा प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे.
घाटातून रेती भरण्यासाठी सध्या मनुष्यबळाचा वापर होत आहे. दिवसभर १०० च्या वर ट्रॅक्टर, २५ डंपर यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. शासनाने लिलावाचे दर ठरवून देण्यासोबतच एक ब्रास रेती कितीला विकायची, याचीही अट घालून दिली आहे; पण नियम धाब्यावर बसवून सर्रास लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून रातोरात अधिक लखपती बनण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महसूल चोरी प्रकरणातील दंड आकारण्याचे प्रमाणही घटले आहे. रेतीचोरी पकडण्यासाठी पथक नेमण्याऐवजी त्याला अभय दिले जात असल्याचे दिसते. यामुळे गोदावरी, वाघोली, खडकी, टेकोडा येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत. टेकोडा ग्रा.पं. चे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.
महसूल विभागाचे धाडसत्र कुठेही कार्यरत नाही. यामुळे चार तलाठी, दोन नायब तहसीलदार यांचे नेमलेले पथक गेले कुठे, असा प्रश्नही कुरवाडे यांनी उपस्थित केला आहे. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. रेतीची दिवसाला होणारी सर्रास चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना देण्यात आल्या आहेत.
अन्य घाटांमध्ये बोटींचा वापर
घाटांतून रेतीचा उपसा करण्याकरिता यंत्रांचा वापर करू नये, असे नियम सांगतात; पण या नियमांना पदोपदी पायदळी तुडविण्याचे काम घाटधारक करीत असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यात नसल्या तरी समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यात सर्रास बोटींचा वापर करून रेतीचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील घाटातून तर मोठ्या प्रमाणात बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.