पाणीदार गावांकरिता दररोज वाढतात श्रमदान करणाऱ्यांचे हात
By Admin | Updated: May 2, 2017 00:16 IST2017-05-02T00:16:51+5:302017-05-02T00:16:51+5:30
गावे पाणीदार करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना संधी मिळाली. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत राबणारे हात दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

पाणीदार गावांकरिता दररोज वाढतात श्रमदान करणाऱ्यांचे हात
वॉटर कप स्पर्धा : शोषखड्डे, नाला खोलीकरण, वृक्ष संवर्धनावर भर; गावकऱ्यांचा प्रतिसाद
वर्धा : गावे पाणीदार करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना संधी मिळाली. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत राबणारे हात दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. काल-परवापर्यंत ५२ गावांमध्ये तब्बल ११६० ग्रामस्थांनी श्रमदान केले. यात गावकऱ्यांसह जिल्ह्यातील इतर भागातील संस्थाही सहभागी होत असून या कालाला हातभार लावत आहे.
पाणी फाऊंडेशनमार्फत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता आर्वी तालुक्यातील ५२ गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी निवडक महिला-पुरूषांना प्रशिक्षण देण्यात आले. जलयुक्त गावासाठी विविध पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो, हे समजावून सांगण्यात आले. यामुळेच प्रशासन व मान्यवरांच्या प्रोत्साहनातून श्रमदानासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. जिल्हा स्थळावरील अधिकारी मंडळी थेट गावात पोहोचून श्रमदान करू लागल्याने गावकऱ्यांनाही हुरूप आला आहे.
वॉटर कप स्पर्धेसाठी तलाव खोलीकरण, वनतलाव, वृक्षरोपण खड्डे, एलबीएस, सीसीटी, शोषखड्डे, दगडी बंधारे, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, लुज बोल्डर स्टक्चरचे बंधारे, शेततळे, पाणलोट बंधारे, विहीर पुनर्भरण आदी कामे श्रमदानातून केली जात आहेत. अपंग व्यक्तीही आपल्या गावातील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून राबत असल्याचे चित्र सदृढ ग्रामस्थांना प्रोत्साहित करीत आहे.
श्रमदानाकरिता गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्धा : विरूळ येथे तलाव खोलीकरण, वनतलाव श्रमदानातून करण्यात आले. वृक्षारोपण खड्डे, एलबीएस, पाच सीसीटीसाठी पोकलॅण्ड प्राप्त झाला होता. येथे दररोज १६० महिला-पुरूष राबत असून यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रसुलाबाद येथे दगडी बंधारे, शोषखड्डे, दगड गोळा करण्याची कामे केली जात आहे.
याप्रमाणेच सायखेडा, मारडा, रोहणा, साखेडा, बोदड, सावंगी (पोड), धनोडी (ब.), काकडदरा, पांजरा (बोथली), उमरी (सुकळी), सालदरा, भादोड, पानवाडी, पिंपळगाव (भोसले पु.), दिघी, बोथली (नटाळा), कासारखेडा, सावद, माळेगाव (ठेका), तळेगाव (रघुजी), बोथली (किन्हाळा), तरोडा, पिंपळखुटा, बेल्हारा, वाढोणा, चिंचोली (डांगे), बेढोणा, पाचोड, दहेगाव (मुस्तफा), मिर्झापूर (नेरी पु.), बाजारवाडा, सर्कसपूर (पु.), धनोडी (नांदपूर), टाकरखेडा, कोपरा (पु.) या गावांत विविध कामे श्रमदानातून केली जात आहे. मान्यवरांकडून गरज पडेल तेथे जेसीबी, पोकलॅण्ड उपलब्ध करून दिले जात आहे. लॉयन्स क्लब, रेडक्रॉस सोसायटी, निरंकारी मंडळ या कार्यात ग्रामस्थांना भरीव सहकार्य करीत असून डॉ. सचिन पावडे प्रत्येक शनिवार व रविवारी गावांत जाऊन श्रमदान करीत आहे. शिवाय प्रत्यक्ष श्रमदान करीत असल्याने ग्रामस्थांचा हुरूप वाढत आहे. पाणी फाऊंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने आर्वी तालुक्यातील ५२ गावे जलयुक्त होण्याच्या दिशेने आगेकुच करीत आहे. या गावांतील श्रमदानात इतर तालुक्यातील ग्रामस्थही काही प्रमाणात सहकार्य करीत असल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाचे सहकार्य, ग्रामस्थांचे श्रमदान व मान्यवरांच्या प्रोत्साहनाने या गावांमध्ये तब्बल ९ हजार ९७० मनुष्य दिवस काम झाले आहे. या कामांवरून गावे जलयुक्त होण्यास फारसा वेळ लागणार नसल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.(प्रतिनिधी)
ग्रामीण भागासह शहरी भागातही व्हावे जलसंधारण
दररोज ४० लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनी काळाची गरज ओळखून पाणी वाचविण्याकरिता आणि त्याच्या संधारणाकरिता श्रमदान करीत कंबर कसली आहे. या तुलनेत शहरी भागात पाण्याचा वापर अधिक असून त्यांच्याकडूनही जलसंधारणाचे काम होणे गरजचे आहे. याकरिता शहरातील नागरिकांनी घरावर पडणारे पाणी ‘वॉटर हार्वेस्टींग’च्या माध्यमातून जमिनीत मुरवावे अथवा विहिरीत सोडावे, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
१४ गावांतील कामे बंद
वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावे पाणीदार करण्याची संधी चालून आली होती. यात ५२ गावांची निवड करण्यात आली होती; पण यातील १४ गावांनी यातून माघार घेतल्याचेच चित्र आहे. यातील कवाडी गावाने तर चक्क नकारच दिल्याचे दिसते. उर्वरित १३ गावांमध्ये पिपरी (पुनर्वसन), बहाद्दरपूर, कृष्णापूर, परसोडी, चोरांबा, राजापूर, कर्माबाद, देऊरवाडा, टोणा, माटोडा, वर्धमनेरी या गावांचा समावेश आहे. या गावांत वॉटर कप स्पर्धेंतर्गत कुठलीही कामे करण्यात येत नसल्याचे दिसून येते. यामुळे ही गावे पाणीदार होण्याच्या संधीला मुकणार असल्याचेच दिसते.
प्रोत्साहनासाठी मान्यवरांचे श्रमदान
ग्रामस्थांना श्रमदानातूनच ही गावे पाणीदार करावयाची आहेत. यामुळे ‘आपले गाव, आपली संमृद्धी’ ही संकल्पना राबवित ग्रामस्थांनाच श्रम करावे लागणार आहेत. या ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्यक्ष प्रशासनही झटताना दिसते. जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, पंचायत समिती तथा विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष गावांत जाऊन श्रमदान करीत आहे. खासगी व्यावसायिक मंडळीही या ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्याकरिता गावांत जात असल्याने श्रमदानाची संस्कृतीही रूजू पाहत आहे.