परंपरेला फाटा देत मुलीने धरले आकटे
By Admin | Updated: November 3, 2016 03:03 IST2016-11-03T03:03:48+5:302016-11-03T03:03:48+5:30
घरात कुणाचा मृत्यू झाला तर आकटे धरण्यापासून तर मृतदेहाला अग्नी देण्यापर्यंतचे सर्व

परंपरेला फाटा देत मुलीने धरले आकटे
पडेगाव येथील प्रसंग : पुरूषप्रधान मानसिकतेला धक्का
चिकणी (जामणी) : घरात कुणाचा मृत्यू झाला तर आकटे धरण्यापासून तर मृतदेहाला अग्नी देण्यापर्यंतचे सर्व संस्कार मुलाच्या वा पुरूषाच्या हाताने पार पाडले जातात. ही परंपरा पुरूषप्रधान संस्कृतीचे द्योतक समजले जाते; पण ज्या घरांत पुरूष मंडळी नाही, त्या घरांमध्ये महिलांनाच पूढे यावे लागते. मग, रूढी, परंपरांचे वेष्टन गळून पडते. असाच प्रसंगी पडेगाव येथे घडला. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलीनेच आकटे धरले आणि मुखाग्नीही दिला. यातून त्यांनी परंपरांना फाटा दिला. पुरूषप्रधान संस्कृतीला धक्का देत आदर्श घालून दिला आहे.
पडेगाव येथील माजी पोलीस पाटील विठ्ठलराव ग. साटोणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ९५ वर्षांचे होते. जुन्या पंरपरांना फाटा देत त्यांची मुलगी चक्रावती पेटकर हिने आकटे धरले. अंत्ययात्रेमध्ये सर्वात समोर आकटे धरलेले मुलगी पाहून ग्रामस्थही अवाक् झाले. स्थानिक शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. अत्यसंस्काराचे संपूर्ण सोपस्कार मुलीनेच पार पाडले. मृतदेहाला मुखाग्नीही मुलीनेच दिला. पुरूषप्रधान संस्कृतीला छेद देत आजच्या युगात मुला-मुलीमध्ये कोणताही भेद उरला नाही, हेच सिद्ध झाले. पडेगाव येथील साटोणे परिवाराने यातून नवीन आदर्शच घालून दिला आहे. मुखाग्नी देण्यासाठी त्यांच्या कुसूम वराटकर, पुष्पा पंचभाई व चक्रावती पेटकर या तीनही मुली उपस्थित होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.(वार्ताहर)
तीनही मुलींनी दिला मुखाग्नी
४घरातील कुणाचाही मृत्यू झाला तर पुरूषांच्या हातात आकटे दिले जाते. अंत्ययात्रेमध्येही महिलांचा सहभाग दिसून येत नाही; पण पडेगाव येथे पित्याचा मृत्यू झाल्यानंतर मुलीनेच आकटे पकडले. अंत्ययात्रेमध्ये सर्वात समोर सहभागी होत मुखाग्नीही दिला. यामुळे तीनही मुली उपस्थित होत्या.