दत्तात्रय देवस्थानातून पुरातन मूर्तींची चोरी
By Admin | Updated: October 9, 2015 02:34 IST2015-10-09T02:34:01+5:302015-10-09T02:34:01+5:30
नजीकच्या भारसवाडा येथील गायकवाड यांच्या वाड्यातील पुरातन देवस्थानातून २० पितळी मूर्तींसह त्यावरील चांदीचे आभूषण, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

दत्तात्रय देवस्थानातून पुरातन मूर्तींची चोरी
पोलिसात तक्रार : पितळी २० मूर्तींसह १.५० लाखांचा ऐवज लंपास
तळेगाव (श्या.पंत.): नजीकच्या भारसवाडा येथील गायकवाड यांच्या वाड्यातील पुरातन देवस्थानातून २० पितळी मूर्तींसह त्यावरील चांदीचे आभूषण, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवारी उघड झाली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारसवाडा येथे गायकवाड वाड्यात दत्ताचे पुरातन मंदिर आहे. त्यासंपूर्ण मंदिराची देखरेख गायकवाड परिवाराकडे आहे. पुजारी म्हणून गोपाल रूंदे काम पाहतात. रात्रीपाळीला चौकीदार धर्मा कांबळे वाड्यात झोपायला असतो. असे असताना बुधवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे पुजारी पुजाअर्चा करण्याकरिता गेला असता त्यांना सदर मंदिरात एकही देवाची मूर्ती दिसून आली नाही. इतरत्र पाहणी केली असता पितळी व चांदीचे दागिने चोरीला गेले असल्याचे दिसून आले. लगेच पुजारी यांनी भास्कर गायकवाड रा. अमरावती यांना माहिती देवून बोलाविले.
मंदिराची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पुर्वेकडील भिंत पडली असल्याने सदर अज्ञात चोरट्यांनी तेथून प्रवेश करून एक फुट उंचीची पितळी दत्ताची एकमुखी मूर्ती, पितळी कृष्णाच्या मोठ्या मूर्ती ३ नग, पितळी उभा असलेला कृ ष्ण बासरीसह एक नग, पितळी गणपती दोन, गारीचा कृष्ण १ त्याच्या गळ्यातील चांदीचे आभूषण, पितळी दत्ताची उभी मूर्ती एक, तांब्याचा कृष्ण लहान एक, लहान गणपती पितळी मूर्ती तीन नग, तसेच देवाच्या अंगावरील चांदीचे आभूषण, असा एकूण दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
सदर घटनेची माहिती तळेगाव पोलीस ठाण्यात दिली. यावरून घटनास्थळी ठाणेदार दिनेश झामरे, कापसे, नंदनवार, सुनील मेंढे यांनी पाहणी करून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभारी संतोष वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे भारसवाड्यात दहशत पसरली आहे.(वार्ताहर)