दत्ता मेघे यांचा आज भाजप प्रवेश
By Admin | Updated: July 5, 2014 01:08 IST2014-07-05T01:08:38+5:302014-07-05T01:08:38+5:30
विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे हे पुत्र माजी आमदार सागर मेघे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन

दत्ता मेघे यांचा आज भाजप प्रवेश
वर्धा : विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे हे पुत्र माजी आमदार सागर मेघे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शनिवारी भाजपात एका समारंभाच्या माध्यमातून प्रवेश करणार आहेत.
सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर सायंकाळी ४ वाजता जिल्हा भाजपाच्यावतीन प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी राहतील.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुधीर दिवे उपस्थित राहतील.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या पराभवामुळे व्यथित झालेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर पराभवाचे खापर फोडत ९ जून रोजी आपल्या पुत्रांसह काँग्रसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
दत्ता मेघे यांची राजकीय कारकीर्द मोठी असून वादळी आहे. त्यांनी आपल्या ३६ वर्षांच्या राजकीय प्रवासात कधीही मागे वळून बघितले नाही. राजकारण करत असताना सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय त्यांच्या समाजसेवेचाच एक भाग आहे. या प्रवासात तीनदा राज्य सरकारमध्ये मंत्रिपद आणि चारदा खासदारकीही त्यांनी उपभोगली. यावेळी जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य विलास कांबळे सुद्धा मेघे यांच्यासह भाजपात जाणार आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)