अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: October 22, 2014 23:22 IST2014-10-22T23:22:02+5:302014-10-22T23:22:02+5:30
शहरासह परिसरातील गावात डेंग्यूने कहर केला आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये डेंग्युच्य वाढीला पोषक वातावरण असल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या पथकाने दिला आहे. डासांच्या उत्पत्तीस

अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात
पुलगाव : शहरासह परिसरातील गावात डेंग्यूने कहर केला आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये डेंग्युच्य वाढीला पोषक वातावरण असल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या पथकाने दिला आहे. डासांच्या उत्पत्तीस शहर व परिसरातील घाणीचे साम्राज्य कारणीभूत असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचा प्रत्यय आर. के. कॉलनी व न्यू कुर्ला परिसरात नागरिकांना येत आहे. नाचणगाव ग्रा़ पं़ अंतर्गत येणाऱ्या या परिसरात डासांचा उद्रेक झाला असून सांडपाण्याच्या नालीचा तिढा कायम आहे.
न्यु कुर्ला व आर.के. कॉलनी येथील नागरिकांनी नाचणगाव ग्रा़पं़ प्रशासनसास याबाबत निवेदन सादर केले़ या दोन कॉलनीतील सांडपाण्याच्या मुख्य नालीचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. आर.के. कॉलनी व न्यू कुर्ला दरम्यान मुख्य सांडपाण्याची नाली आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून या नालीची कोणत्याच प्रकारची साफसफाई केली नाही. यामुळे गाळ व कचरा साचला असून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे़ ही नाली काही भागात खचल्याने चिखल होतो़ यामुळे नालीच्या काठावर राहणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़
न्यू कुर्ला परिसरातील अनेकांनी नालीवर अतिक्रमण केले आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नालीतील कचऱ्याचा पूर्णपणे उपसा करता येत नाही. सध्या डेंग्यूने डोके वर काढले असून आजवर या आजाराचे चार बळी आहेत. या आजाराचे थैमान सुरूच असताना स्थानिक प्रशासन बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसते़ या भागातील नागरिकांनी ग्रा़पं़ प्रशासनाने अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप कारवाई करण्यात आली नाही़ परिसरात डेंग्यूसदृश्य आजाराचे १० रुग्ण आढळले आहेत़ शिवाय प्रत्येक घरात किमान एक रुग्ण तापाने आजारी आहे. अशा स्थितीत नालीची स्वच्छता करून डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे. परिसरात शेणाचे ढिगारेही आहेत. यासाठी वेगळी जागा निश्चित करावी. या ढिगाऱ्यांमुळे डास वाढत आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)