सोयाबीनची मळणी धोक्यात
By Admin | Updated: October 3, 2016 00:36 IST2016-10-03T00:36:21+5:302016-10-03T00:36:21+5:30
जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे.

सोयाबीनची मळणी धोक्यात
सततच्या पावसाने शेतात चिखल : शेंगा फुटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
वर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे. शेतात चिखल होत असल्याने सोयाबीनची मळणी रखडली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
पावसाळ्याच्या मृग नक्षत्रापासून निसर्गाने उत्तरा नक्षत्रापर्यंत शेतकऱ्यांना साथ दिली; पण उत्तरा नक्षत्र सुरू होतात पाऊस लागून पडल्याने सोयाबीन पिकाची मळणी धोक्यात आली. सोयाबीनच्या शेंगा दाण्यांनी भरल्या असून मळणीला विलंब झाल्यास त्या फुटून त्यातील दाणे खाली पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची भीती त्यांच्या मनात घर करीत असल्याचे दिसत आहे.
हातात आलेले पीक पोत्यात जाण्याअगोदर ते खाली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सतत सुरू असलेला पाऊस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरत आहे. सोयाबीन कापणीचे दिवस येताच २६ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला अन् मुसळधार पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कापणीस आलेले शेतातच उभे असलेल्या सोयाबीनच्या शेंगा उन्ह तापताच फुटण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असतानाच शेंगांना झाडावरच अंकूर फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)