लिलाव न झाल्याने नगर पंचायतचे नुकसान
By Admin | Updated: May 23, 2016 02:11 IST2016-05-23T02:11:16+5:302016-05-23T02:11:16+5:30
नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला;

लिलाव न झाल्याने नगर पंचायतचे नुकसान
आठवडी बाजाराचा प्रश्न : पदाधिकाऱ्यांची अनास्था
समुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी, नगर पंचायतीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अद्याप बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगर पंचायतीला सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा आठवडी बाजार आहे. या बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, हा प्रश्नच आहे. सदर बाजार आठ-दहा एकराच्या परिसरात भरतो. जिल्हा परिषदेच्या जुन्या बाजार ठेकेदाराकडून नाममात्र ५ हजार रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्यक्षात, किमान २० हजार रुपयांवर प्रत्येक बाजाराची वसुली होते. वसुली करणारा कंत्राटदार व नगर पंचायतच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा खासगी गावकट्टावर सुरू आहे. प्रत्येक बाजाराला नगर पंचायतचे १५ ते १८ हजार रुपयांचे नुकसान होते. विशेष म्हणजे जानेवारी ते मे पर्यंत बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. यानंतर पावसाळ्यात बाजार कमी प्रमाणात भरत असून वसुलीही कमी होते. यामुळेच जाणीवपूर्वक बाजाराच्या भरभराटीच्या काळात लिलाव केला जात नसल्याचे दिसून येते. यात नगर पंचायतीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकाचवेळी स्थापन झालेली सेलू व समुद्रपूर नगर पंचायत आहे. सेलू नगर पंचायतीच्या बाजाराचा मोठ्या रकमेत एक महिन्यापूर्वी लिलाव झाला; पण समुद्रपूर नगर पंचायतच्या बाजाराचा लिलाव का होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. समुद्रपूर नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याचा कांगावा केला जातो; पण सेलू नगर पंचायतीलाही नियमित मुख्याधिकारी नसताना लिलाव होतो तर समुद्रपूरला का नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.(तालुका प्रतिनिधी)