दाभोलकरांच्या द्वितीय स्मृतिदिनी निषेध रॅली
By Admin | Updated: August 21, 2015 02:30 IST2015-08-21T02:30:58+5:302015-08-21T02:30:58+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली.

दाभोलकरांच्या द्वितीय स्मृतिदिनी निषेध रॅली
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासनाच्या कारवाई शून्यतेचा निषेध
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या आरोपींना पकडण्यात अद्याप राज्यकर्त्यांना यश आले नसल्याने त्यांच्या द्वितीय स्मृती दिनी गुरुवारी शहरातील विविध पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली.
यात विविध महाविद्यालययातील विद्यार्थ्यांनी अनेकांत स्वाध्याय मंदिर, वंजारी चौक येथून निषेध रॅली काढून इंदिरा मार्केट मार्गे सोशालिस्ट चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा घेवून रॅलीचा समारोप करण्यात आला. नंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना महामहिम राष्ट्रपती यांना डॉ. दाभोलकर व डॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पुढाकार घ्यावा या आशयाचे निवेदन दिले.
रॅलीत कामगार संयुक्त आघाडीचे गुणवंत डकरे, महाराष्ट्र अ.नि.स.चे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे प्रा. श्रीरंग मेंढे, राष्ट्रसेवा दलाचे नितीन पाटील, मा.क़प.चे दुबे यासह सहभागींनी निदर्शन केले.(प्रतिनिधी)