सिलिंडर, ग्राहकांना वेटींगच!
By Admin | Updated: October 30, 2014 22:56 IST2014-10-30T22:56:50+5:302014-10-30T22:56:50+5:30
ऐन दिवाळीच्या पर्वावर जिल्ह्यात सर्वत्र गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता़ या टंचाईच्या काळातही व्यावसायिकांना सुरळीत सिलिंडर मिळत असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़

सिलिंडर, ग्राहकांना वेटींगच!
वर्धा : ऐन दिवाळीच्या पर्वावर जिल्ह्यात सर्वत्र गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता़ या टंचाईच्या काळातही व्यावसायिकांना सुरळीत सिलिंडर मिळत असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध आणि घरगुती नाही, हा प्रकार अनेकांना समजला नाही़ गॅसवर वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांनाही घरगुती सिलिंडर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांत असंतोष दिसून येत आहे़
ग्राहकांना गॅस घ्यायचे म्हटले की, दोन आठवड्यासाठी वेटींग करावी लागते; पण व्यावसायिकांना काळ्या बाजारातून केवळ एका फोनवर सिलिंडर घरपोच मिळत असल्याचा अनुभव टंचाईच्या काळातही सामान्य ग्राहकांनी घेतला़ या प्रकारामुळे नागरिक बुचकळ्यात पडले होते़ वर्धा जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक अधिक ग्राहक आहेत. यातील ५० टक्के ग्राहकांना ३ ते ४ महिन्यांत केवळ एकदाच गॅस सिलिंडर मिळत आहे़ गॅस धारकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानात मिळतात; पण त्यांना एवढे सिलिंडर लागत नसल्याने उर्वरित सिलिंडर एजन्सीकडून काळ्या बाजारात विकले जातात़ ग्राहकांनी सिलिंडरची बुकिंग केल्यानंतर त्यांना सिलिंडर मिळविण्यासाठी तब्बल १५ दिवसांची वेटींग करावी लागत आहे. उलट काळ्या बाजारातून हे गॅस सिलिंडर व्यावसायिकांना पुरविले जात असल्याचा आरोप ग्राहकांतून केला जात आहे. घरपोच सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांची अनेकवेळा ससेहोलपट होते; पण त्यांना ते मिळत नाही. व्यावसायिक लोकांनी एक फोन केला की, दुसऱ्या मिनिटाला सिलिंडर दुकानासमोर हजर होते. यावरून संबंधित विभागाला सर्वसामान्य ग्राहकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते़ चढ्या भावाने का होईना पण लवकर सिलिंडर उपलब्ध होत असल्याने व्यावसायिकही अधिक मागणी करीत असल्याचे दिसते़ या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले आहेत.
गॅस कनेक्शनमध्येही ग्राहकांची लूट केली जात असून पावतीवर दाखविलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याचा आरोगप ग्राहक करताहेत़ याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)