आजनडोह येथे सिलिंडरचा भडका

By Admin | Updated: November 1, 2016 01:51 IST2016-11-01T01:51:38+5:302016-11-01T01:51:38+5:30

कारंजा (घाडगे) तालुक्यातील आजनडोह येथील रमधम यांच्या घरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिलिंडरचा

Cylinder split at Azadoh | आजनडोह येथे सिलिंडरचा भडका

आजनडोह येथे सिलिंडरचा भडका

कन्नमवारग्राम : कारंजा (घाडगे) तालुक्यातील आजनडोह येथील रमधम यांच्या घरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिलिंडरचा चांगलाच भडका उडाला. शनिवारी झालेल्या या घटनेत घरातील तिघे गंभीर रित्या भाजल्या गेले. तर घरात बांधून असलेली एक बकरीही यात भाजल्या गेल्याने तिचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, आजनडोह येथील जीवन गजानन रमधम यांच्या घरी दीपावली साठी ५ ते १० दिवसांपूर्वी सिलिंडर आणून ठेवले होते. घरातील सिलिंडर संपल्याने त्यांनी शनिवारी हे सिलिंडर लावण्याकरिता काढले; परंतु सिलिंडरचे झाकण काढताच त्यातून सू-सू असा आवाज येणे सुरू झाला. त्यामुळे सिलिंडर लिक आहे, बाहेर काढून पाहावे म्हणून घरातून सिलिंडर व शेगडी अंगणात आणली. त्या सिलिंडरला रेग्युलेटर लावण्याची तयार करीत असतानाच एकदम सिलिंंडरचा भडका उडाला. त्यामुळे बाजुला असलेला जीवन यांचा भाऊ सुनील रमधम, मुलगी अर्पीता सुनील रमधम (१४) व भाची हर्षला धनराज कामडी (१३) हे या भाजल्या गेले. या आगीमुळे घराच्या आवारात उभी असलेली दुचाकीही जळाली. तर एका चारचाकी वाहनाचेही या आगीमुळे नुकसान झाले. यात जीवित हानी झाली नसली तरी आगीमुळे भाजलेल्या बकरीचा मात्र मृत्यू झाला.
जखमींना लगेच कन्नमवारग्राम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राज आणून उपचार केले. संबंधित एजन्सी धारकाला सुचना केल्यावर त्याने तातडीने कर्मचारी पाठविले. घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देवून सविस्तर माहिती घेतली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावरून ग्रामीण भागात एजन्सी धारकांनी सिलिंडर योग्यप्रकारे तपासून घ्यावे व होणारे नुकसान टाळावे, अशी जनमानसात चर्चा आहे.(वार्ताहर)

Web Title: Cylinder split at Azadoh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.