आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट

By Admin | Updated: May 28, 2017 00:26 IST2017-05-28T00:26:31+5:302017-05-28T00:26:31+5:30

सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत चौकीदार असलेल्या ठाकरे यांच्या घराला शॉट सर्कीटने आग लागली.

Cylinder blast with fireball | आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट

आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत चौकीदार असलेल्या ठाकरे यांच्या घराला शॉट सर्कीटने आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने छप्पर उडाले. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी घरी कुणी नसल्याने जीवितहानी झाली नसली तरी इतर साहित्याचा कोळसा झाला.
प्राप्त माहितीनुसार, सावंगी मार्गावरील ड्रीम लॅन्ड सिटीत कृष्णाजी ठाकरे हे चौकीदार म्हणून काम करीत आहेत. मागील एक-दोन दिवसांपासून हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी त्यांच्या घराला अचानक आग लागली. याची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तसेच घटनेची माहिती वर्धा पालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आगीने रौद्ररूप धारण केले. यात ठाकरे यांच्या घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भडका झाला. याची माहिती आग विझविणाऱ्यांना होण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील छताच्या चिंधड्या झाल्या.
आग आटोक्यात आल्यानंतर आगीच्या कारणाचा शोध घेतला असता शॉट सर्कीटने लागल्याचे लक्षात आले. यात ठाकरे यांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्याचा कोळसा झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून ठाकरे यांना मदत देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Cylinder blast with fireball