टिप्परच्या धडकेत सायकलस्वार गंभीर
By Admin | Updated: September 25, 2015 02:40 IST2015-09-25T02:40:14+5:302015-09-25T02:40:14+5:30
आजनगाव येथून दहेगावकडे सायकलने जात असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत मधुकर सुखाजी बावणे (६५) रा. दहेगाव हे गंभीर जखमी झाले.

टिप्परच्या धडकेत सायकलस्वार गंभीर
चालक पसार : गुन्हा दाखल
सेलू : आजनगाव येथून दहेगावकडे सायकलने जात असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत मधुकर सुखाजी बावणे (६५) रा. दहेगाव हे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आजनगाव-दहेगाव मार्गावर झाला.
प्राप्त माहितीनुसार, बावणे सायकलने गावाकडे येत असताना टिप्परने धडक दिली. या जबर धडकेत सायकलस्वार टिप्परच्या मागील चाकात आल्यामुळे गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद दहेगाव (गो.) पोलिसात करण्यात आली असून टिप्पर चालकावर कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
इसमावर शस्त्राने हल्ला
वर्धा- पत्नीच्या अंगावर खरकटे पाणी का फेकले अशी विचारणा करण्यावरून दादाराव काळे (६२) रा. बेढोणा यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले. ही घटना बेढोणा येथे गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, दादाराव काळे यांच्या पत्नीच्या अंगावर शेजारी राहणाऱ्या लीलावती काळे हिने पाणी उडविले. यावरून लीलावतीने वाद उपस्थितीत केला. याबाबत विचारणा करण्यासाठी दादाराव गेले असता त्यांचासोबत वाद उपस्थित करून धारदार शस्त्राने मारहाण केली. याबाबत आर्वी पोलिसांनी काळे यांच्या तक्रारीवरून लीलावती काळे विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वादात मध्यस्थी करणे भोवले
वर्धा- पती-पत्नीचा वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नंदेश्वर चौधरी (६५) यांना जावयाने मारहाण करून जखमी केले. ही घटना आंजी शिवारात सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत आशा आलोडे यांनी देवळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रल्हाद आलोडे याच्यावर भादंविच्या कलम ३२३, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रल्हाद व आशा या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. प्रल्हादने आशाला मारहाण करीत असल्याचे पाहुन आशाचे वडील नंदेश्वर चौधरी यांनी हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता जावयाने त्यांच्यावर हल्ला केला.