Lok Sabha Election 2019; मोदींच्या सेवाग्राम आश्रम भेटीबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:46 IST2019-03-31T23:41:02+5:302019-04-01T11:46:22+5:30
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते.

Lok Sabha Election 2019; मोदींच्या सेवाग्राम आश्रम भेटीबाबत उत्सुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते. त्यानंतर आता पाच वर्षांनंतर मोदी पुन्हा भेट देतील काय? याविषयी उत्सुकता कायम आहे. शनिवार व रविवारी पोलीस प्रशासनाने आश्रम परिसराची पाहणी करून येथील स्थिती जाणली. त्यामुळे या भेटीबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी वर्धा लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी २० मार्च २०१४ रोजी वर्ध्यात सभा घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली होती. यावेळी आश्रमचे साधक जालंधरनाथ, महात्मा गांधीजींचे नातू व निर्मला बहन गांधी यांचे पुत्र कनू गांधी, आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव उपस्थित होते.
यावेळी मोदींना हिंद स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग, लोकप्रतिनिधी कसा असावा, गांधी जसे दिसले तसे स्वीकारले, आत्मकथा ही पुस्तके भेट देण्यात आली होती. श्रीराम जाधव यांनी आश्रमच्यावतीने गांधी व कस्तुरबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने निवेदन दिले होते. कनू गांधी यांच्याशी संवाद साधला. आश्रमातील स्मारकांची माहिती घेऊन बापूकुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. अभिप्राय नोंदवहीत आपला अभिप्राय लिहिला. विशेषत: तो गुजराती भाषेत लिहिला गेलेला आहे. आता पुन्हा विदर्भातील प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातून करणार आहे. गांधींचे यंदा १५० वे जयंती वर्ष आहे. यानिमित्त मोदी आश्रमाला भेट देतात काय? याविषयी उत्सुकता कायम आहे. आश्रम परिसरात भेट देणार असते तर सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असती. मात्र, अद्याप कोणतीही व्यवस्था नसल्याने केवळ चर्चेलाच या बाबत पेय फुटले आहे.