उत्सुकता शिगेला, जि.प. व पं.स.ची आज आरक्षण सोडत

By Admin | Updated: October 5, 2016 01:39 IST2016-10-05T01:39:34+5:302016-10-05T01:39:34+5:30

जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह राजकीय रंगही चढत असल्याचे मंगळवारी दिसून आले.

Curiosity Shigella, ZP And today's reservation of PDS | उत्सुकता शिगेला, जि.प. व पं.स.ची आज आरक्षण सोडत

उत्सुकता शिगेला, जि.प. व पं.स.ची आज आरक्षण सोडत

जिल्हा परिषदेत ५१ ऐवजी ५२ गट : नगरपंचायत झालेल्या गट व गणांचा फटका कुणाला, नव्या गट-गणात कुणाचे भाग्य, याकडे अनेकांचे लक्ष
वर्धा: जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह राजकीय रंगही चढत असल्याचे मंगळवारी दिसून आले. येत्या वर्षात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता बुधवारी आरक्षण सोडत आहे. यामुळे येत्या पंचवार्षिकेत आपली जागा राहते किंवा ती जाते याकडे जिल्ह्यातील आजी माजी दिग्गजांचे लक्ष लागले आहे. गत दोन पंचवार्षिकतेचे आरक्षण घेत त्याचे गणित लावून आपले आरक्षण कायम राहावे, याकरिता अनेकांनी देव पाण्यात टाकले. यात ते तरणार अथवा त्यांच्या इच्छा आकांशांवर पाणी फेरले जाणार याचा फैसला बुधवारीच होणार आहे.
सध्या असलेल्या गटा-गणातून आपले आरक्षण गेल्यास दुसऱ्या गट-गणातून जुगाड जमविण्याबाबतही अनेकांची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय जिल्ह्यात यंदा आष्टी (शहीद), कारंजा (घाडगे), समुद्रपूर व सेलू हे चार जि.प. गट नगरपंचायत झाले. यामुळे जिल्हा परिषदेत गटांची संख्या कमी होणार असे भाकीत असताना यात वाढ झाली आहे. आतापर्यंत ५१ सदस्यांचे असलेले मिनी मंत्रालय येत्या निवडणुकीपासून ५२ सदस्यांचे होणार आहे. यात नगरपंचायत झालेल्या सेलू येथील गटाची जागा सुकळी (स्टेशन), समुद्रपूर येथील जागा जाम तर आष्टी (शहीद) व कारंजा (घाडगे) येथील जागा रद्द झाल्या. तर वर्धा तालुक्यात जिल्हा परिषदेचे वरूड, म्हसाळा व सालोड (हिरापूर) असे तीन नवे गट निर्माण होणार असल्याची चर्चा अधिकारी वर्गात आहे. यावर आरक्षण सोडतीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.
नव्याने निर्माण होणाऱ्या गट व गणांकडे आजी माजी दिग्गजांचे लक्ष असून तिथे आपले जमेल काय, असेही गणित त्यांच्याकडून मांडण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात दिसून आले. हिच स्थिती पंचायत समिती गणाची आहे. येथेही आता सदस्य संख्या १०२ ऐवजी १०४ झाली आहे.
या सदस्यांचेही आरक्षण बुधवारी जाहीर होणार आहे. आपल्या गणात आपली जागा कायम राहते अथवा नाही याकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तर काही ठिकाणी गणित बिघडलेल्या जुन्यांनी यंदा आपली लॉटरी लागणार असल्याची भाकीते मांडली आहेत. त्यांची भाकीते खरी ठरतात अथवा यंदाही त्यांची निराशाच होते याकडे अनेकांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील संभाव्य पाच नवे गट व गण
जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर गट नगरपंचायतीत परीवर्तीत झाले. यामुळे या चार गटातील व गणातील सदस्यांचे काय, असा प्रश्न साऱ्यांना पडला. त्यांची जागा कायम राहते किंवा ते रद्द होते याकडे जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.
आष्टी व कारंजा येथील पद रद्द झाले असून या क्षेत्रातील सदस्य संख्या घटली आहे. आष्टी येथे आता चार ऐवजी तीन तर कारंजा येथे पाच ऐवजी चार गट राहणार आहे. तर सेलू येथील गट सुकळी (स्टेशन) आणि समुद्रपूर येथील गट जाम येथे तर वर्धा तालुक्यात सालोड, वरूड आणि म्हसाळा या तीन नव्या गटामुळे ११ ऐवजी १४ गट राहणार असल्याची माहिती आहे.

गटांचे आरक्षण विकास भवनात
जिल्हा परिषद गटाचे बुधवारी निघणारे आरक्षण विकास भवनात काढण्यात येणार आहे. विकास भवनात कोणाची जागा कायम राहते व कोणाचे गणित बिघडते याचा खुलासा होणार आहे. यामुळे आपले आरक्षण कायम रहावे याकरिता अनेकांनी देव पाण्यात टाकले आहे. यात कोणाच्या आशांवर पाणी फेरले जाते व कोणाची जागा टिकते हे बुधवारी समोर येईलच.
आठही गणाच्या आरक्षणाची सोडत पंचायत समिती स्तरावर होणार आहे. येथेही अनेकांच्या येत्या पंचवार्षिकीचे भविष्य ठरणार आहे. येथेही विद्यमानांसह माजी दिग्गजांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे.

Web Title: Curiosity Shigella, ZP And today's reservation of PDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.