नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने बहरली कपाशीची शेती
By Admin | Updated: December 11, 2015 02:51 IST2015-12-11T02:51:09+5:302015-12-11T02:51:09+5:30
सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही.

नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने बहरली कपाशीची शेती
एकरी २५ क्विंटल कापूस : कृषी तज्ज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचेही मार्गदर्शन
प्रफुल्ल लुंगे सेलू
सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही. कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत आहे; पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती केली तर अपेक्षितच नव्हे तर विक्रमी उत्पादन घेऊन भरघोस नफा मिळविता येतो. हे घोराड येथील गिरीधर वरटकर या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.
गिरीधर वरटकर हे शिक्षक आहे; पण त्यांना शेतीची मनापासून आवड आहे. ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. शेजारच्या शेतकऱ्यांनाही हे प्रयोग पे्ररणादायी ठरावे, हा त्यांचा खराटोप असतो. त्यांनी यंदा दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली. प्रायोगिक तत्वावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. पट्टा पद्धतीने तीन बाय सहा, अशा पद्धतीने लागवड करून लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने खत दिले. आतापर्यंत खताच्या चार मात्रा झाल्या. किडीचा नायनाट करण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेत चार वेळा फवारणी केली. गरजेनुसार पाणी दिले. झाडाची वाढ जोमदार झाल्याने दोन ओळीतील अंतर सहा फुटाचे असताना झाड वाकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी बांबू लावून तार व दोरीच्या साह्याने झाडांची फांदी बांधली. यामुळे झाड सरळ उभे राहिले. आज या झाडांची उंची साडे पाच ते सहा फुट असून प्रत्येक झाडाला १५० ग्रॅम वजनाच्या वर बोंड आहे. आजपर्यंत साडे बारा क्विंटल प्रती एकर कापूस वेचून झाला आहे. त्यांना एकरी २५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. दोन एकरात ५० क्विंटल कापूस होईल, असे शेतीला भेट देणाऱ्या कृषीतज्ज्ञांचे मत आहे.
कृषी तज्ज्ञांसह वरटकर यांना अंबोडा (यवतमाळ) येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनीही पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.