निकृष्ट सिमेंट खांब; वीज वाहिनीला धोका
By Admin | Updated: February 4, 2015 23:19 IST2015-02-04T23:19:53+5:302015-02-04T23:19:53+5:30
ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात

निकृष्ट सिमेंट खांब; वीज वाहिनीला धोका
अमोल सोटे - आष्टी (श़)
ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात नसल्याने या प्रवाहित वीजवाहिन्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत़ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़
आर्वी विभागांतर्गत, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा, पुलगाव असे उपविभाग आहे. या सर्व विभागात नवीन व जुन्या वीज वाहिन्या दुरूस्तीचे काम धडाक्यात सुरू आहे. यासाठी सिमेंटचे खांब वापरले जात आहे. खांबांमध्ये सळाखी कमी आणि गिट्टी अधिक असल्याने अनेक खांब अर्ध्यातून तुटत आहेत़ काही ठिकाणी ते वाकल्याचे दिसते़ जमिनीत खोलवर खोदून त्यात मजबूत व दर्जेदार काँक्रीट ५ फुटापर्यंत करावे लागते. संबंधित यंत्रणा अवघ्या दीड फुटाचे काँक्रीट करून खांब गाडत आहे. यात लाखो रुपयांचा गैरप्रकार होत आहे. या कामाची सर्व बिले मुकाट्याने पारित होतात, हे विशेष! आर्वी विभागातील बेताल व भोंगळ कारभार निकृष्ट कामांना मुकसंमती देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आष्टी तालुक्यातील साहूर, अंतोरा परिसरात सर्वाधिक बोगस काम दिसून येते़ आर्वी तालुक्यातील वाठोडा पुनर्वसन लगतच्या भागातील लाखो रुपयांचे काम संशयाच्या भोवऱ्यात आहे. वीज वितरण कंपनी अस्तित्वात नसलेल्या कामांची नोंद मोजमाप पुस्तिकेत करीत आहे. यात तांत्रिक तपासणी विभागातील एक कनिष्ठ अभियंता पार्टनर असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचे काम संबंधित अधिकारी करीत असून योजनांची वाट लावत आहे़