वाढीव विद्युत देयकाच्या विरोधात जनसमुदाय रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:43+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेला. अजूनही परिस्थिती पाहिजे तशी बरी झालेली नाही. अशा परिस्थितीतही महावितरणने माहे मार्च ते मे महिन्यात मोठे विद्युत देयक नागरिकांना दिले आहे.

वाढीव विद्युत देयकाच्या विरोधात जनसमुदाय रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण याच काळात महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना वाढीव विद्युत देयक दिले. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी. शिवाय समाजातील दुर्बल घटकांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी संबंधितांना निवेदनातून करण्यात आली. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात रास्तारोको आंदोलन करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेला. अजूनही परिस्थिती पाहिजे तशी बरी झालेली नाही. अशा परिस्थितीतही महावितरणने माहे मार्च ते मे महिन्यात मोठे विद्युत देयक नागरिकांना दिले आहे. या तीन महिन्यातील विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी संबंधितांकडे मनसेच्यावतीने वेळोवेळी निवेदन देऊन करण्यात आली. मात्र, राज्य सरकारकडून यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शिवाय मागणी जैसे थेच आहे. परिणामी, बुधवारी नागरिकांना सोबत घेऊन मनसेच्यावतीने हिंगणघाट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पण काही वेळानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. तीन महिन्याचे विद्युत देयक राज्य शासनाने माफ करावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनात अमोल बोरकर, सुनील भुते, सुभाष चौधरी, रमेश घंगारे, राहुल सोरटे, किशोर चांभारे, नीता गजभे, संगीता घंगारे, मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, जगदीश वांदिले, किशोर भजभुजे, राजू सिन्हा, जयंत कातरकर, मनोज गिरडे, गजु चिडे, कवडु ब्राह्मणे, नीलेश खाटीक, अनिकेत हिवाळे, वासुदेव वैरागडे, प्रशांत एकोणकार, अमोल मेढुले, गोमाजी मोरे, सुधाकर वाढई, प्रल्हाद तुळाले, भोला इंगोले, शेखर ठाकरे, रुपेश चंदनखेडे, सुनील खेकारे आदी सहभागी झाले होते.
विद्युत जोडणी कापल्यास तीव्र आंदोलन
लॉकडाऊनच्या काळातील वाढून आलेले तीन महिन्याचे विद्युत देयक सरसकट माफ करा अशी आमची रास्त मागणी आहे. पण वारंवार निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले. त्यामुळे विद्युत देयक कसे अदा करावे हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. जर महावितरणने विद्युत देयक न भरणाऱ्या नागरिकांची विद्युत जोडणी कापली तर महावितरणच्या कार्यालयातच मनसे स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिला आहे.