भगवान बालाजीच्या रथोत्सव यात्रेत भाविकांची गर्दी
By Admin | Updated: October 16, 2016 01:55 IST2016-10-16T01:55:31+5:302016-10-16T01:55:31+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली.

भगवान बालाजीच्या रथोत्सव यात्रेत भाविकांची गर्दी
१५३ वर्षांची परंपरा : वायगाव नगरीत ‘हरि नारायणाचा’ गजर
वायगाव (नि.) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली. टाळ मृंदगाच्या साथीने शुक्रवारी गावातून निघालेल्या रथयात्रेत सहभागी भाविकांच्या ‘हरि नारायण गोविंद’च्या जयघोषाने संपूर्ण वायगाव नगरी भक्तीमय झाली होती.
रथयात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी नवयात्रात आरती, पूजन, भजन आदी कार्यक्रमाची रेलचेल आहे. या रथयात्रेला १५३ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. रथयात्रेनिमित्त गावात रात्रभर उत्साही वातावरण असते. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी दहीहांडी, काला, प्रसाद वितरण पार पडले. श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सवात जिल्ह्यातील भाविकांची उपस्थिती होती. भाविकांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. या निमित्त रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथाभोवती रोषणाई करूण हजारो भाविकांच्या साथीने यात्रा काढण्यात आली. उत्सव काळात कोणतीच अप्रीय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देवळीचे ठाणेदार चंद्रकांत मदणे यांच्या मार्गदर्शनात देवळी, खरांगणा, पुलगाव व अल्लीपूर पोलीस ठाण्यातील चार अधिकारी, ४० पोलीस, १५ होमगार्ड बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आले. या कर्मचाऱ्यांसह वायगाव (नि.) पोलीस चौकीचे विनायक खकडे, गजानन राऊत, श्रावण ठाकरे, पवन बाभुळकर यांनी मंदिराच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. (वार्ताहर)