कुंपणाच्या खांबासह वाहून गेली पिके
By Admin | Updated: August 10, 2015 01:47 IST2015-08-10T01:47:01+5:302015-08-10T01:47:01+5:30
गत आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर संततधार पावसाचे आगमन झाले. हा पाऊस सुखावणारा असला तरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कुंपणाच्या खांबासह वाहून गेली पिके
सावरडोह येथील प्रकार : १० शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका; मदतीकरिता शासनाला साकडे
कारंजा (घा.) : गत आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर संततधार पावसाचे आगमन झाले. हा पाऊस सुखावणारा असला तरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सावरडोह परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेली आणि पिके वाहून गेली. इतकेच नव्हे तर शेताचे कुंपण आणि स्प्रिंकलर पाईपही वाहून गेलेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. याबाबत सावरडोह येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून मदतीचे साकडे घातले आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र संततधार पावसासह वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. हा पाऊस पिकांकरिता लाभदायक ठरणारा असला तरी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतजमीन खरडली गेली असून पिके वाहून गेली आहेत. सावरडोह शिवार व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याने वाहून गेली. येथील अनेक शेतकऱ्यांनी शेतांना कुंपण केले होते. हे कुंपण खांबांसह वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात स्प्रिंकलर होते. यात पाईपही वाहून गेलेत. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. याबाबत सावरडोह येथील मुरलीधर भूयार, राजू जोरे, रामचंद्र देशमु, उदेभान कुंभरे, गोवर्धन मोहिते, सुरेश गुडधे, संतोष काकडे, भानुदास ढोले, भाऊ मोहिते आणि युवराज ढोले यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. यात सावरडोह व परिसरातील शेतपिकांची पाहणी करावी, शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याचे साकडेही शेतकऱ्यांनी घातले.(शहर प्रतिनिधी)
नादुरूस्त पुलामुळे शेतात साचले पाणी; कपाशीचे नुकसान
टाकरखेडा - नांदपूर टाकरखेडा रस्त्यावरील नादुरूस्त पुलातून पाणी जात नसल्याने शेतात पाणी साचून कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अनेकदा लेखी तक्रारी देऊनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकरी अनिल भालतडक व अशोक भालतडक यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
टाकरखेडा येथील शेतकरी अनिल भालतडक व अशोक भालतडक यांचे शेत सर्व्हे क्र. २७२ नांदपूर-टाकरखेड रस्त्यावर आहे. या रस्त्यावर असलेल्या नादुरूस्त पुलामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी सदर शेतकऱ्यांच्या शेतात ते साचते. गत दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतपिकांमध्ये साचून राहिल्याने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. हा प्रकार दरवर्षी पावसाळ्यात घडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत तीन-चार वर्षांपासून या शेतकऱ्यासंना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला लेखी तक्रारी दिल्या; पण पुलाची दुरूस्ती करण्यात आली नाही.
शेती हे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. संबंधित विभागाने पुलाची दुरूस्ती करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन त्यांनी दिले आहे.(वार्ताहर)
पूरग्रस्त भागाची आमदारांनी केली पाहणी
आर्वी - तालुक्यात आलेल्या पुरामुळे बाकळी व इतर नदीकाठच्या शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची तालुक्यातील तिव्रता पाहता शुक्रवारी आमदार अमर काळे यांनी पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली.
बाकळी नदीने सर्वाधिक फटका बसलेल्या जळगाव येथील घरांची व नदीकाठच्या शेतांची आ. काळे यांनी पाहणी केली. नदी, नाल्या काठच्या व प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचा समावेश आहे. या नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी व्यक्त केली. या पूरग्रस्त भागात जळगाव गावातील पुरामुळे पडलेली घरे व खरडून गेलेल्या शेत जमिनीची आ. काळे यांनी पाहणी केली.
यावेळी उपविभागातील कृषी अधिकारी अरुण बळसाणे, तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गुल्हाणे, कृषी सहायक, तलाठी यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. बाकळी नदीच्या पुराने तालुक्यातील नदी व नाल्याच्या काठावरील शेतांना पुराचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदारांनी दिली.
वाघाडी नाल्याच्या खोलीकरण व रूंदीकरणाची मागणी
आष्टी (श.) - तालुक्यातील लहानआर्वी येथे बुधवारी वाघाडी नाल्याला पूर आल्याने पाणी गावात शिरले. यामुळे गावाला धोका निर्माण झाल्याने नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लहानआर्वी येथील वाघाडी नाल्याला पूर आल्याने पाणी गावात शिरले होते. सुदैवाने कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही. सदर नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी ८ जून रोजी तहसीलदारांना निवेदनातून केली होती; पण अद्याप त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर सदर नाल्याची व पुराची पाहणीही करण्यात आली नाही. २७ डिसेंबर २०१३ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर नाल्याच्या खोलीकरण व रूंदीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता; पण तो निवडणूक आचार संहितेमुळे शासनजमा करण्यात आला. यावर्षी लहानआर्वी गावाला वाघाडी नाल्याच्या पुराचा धोका होण्याची शक्यता निवेदनातून वर्तविण्यात आली होती.
वाघाडी नाल्यात झुडपे वाढली असून नाला अरूंद आहे. यामुळे किमान १००० मीटर नाल्याचे काम करणे गरजेचे आहे. पावसाळ्याची आणखी दोन महिने शिल्लक आहे. यामुळे लहानआर्वी गावात नाल्याचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. गावात पुन्हा पाणी शिरून नुकसान झाले तर ग्रामस्थांना नाहक बळी पडावे लागणार आहे. यामुळे लहानआर्वी गावातील वाघाडी नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण त्वरित करावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही लहानआर्वीचे सरपंच सुनील साबळे व ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
बाकळी नदीच्या खोलीकरणाची मागणी
आर्वी - तालुक्यात प्रत्येक पावसाळ्यात बाकळी नदीच्या पुराने सर्वाधिक नुकसान शिरपूर (बोके) या गावातील शेतकऱ्यांचे होते. दरवर्षी पुराच्या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून जाते. यामुळे बाकळी नदीचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर येथील ग्रामस्थांनी आमदार अमर काळे यांना निवेदनातून केली.
प्रत्येक वर्षी शासनाच्यावतीने या गावातील नुकसानीचा सर्व्हे केला जातो. यानंतर तुटपुंजी रक्कम दिली जाते. दरवर्षी होणाऱ्या या नुकसानातून ग्रामस्थांची कायमस्वरूपी सुटका करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी बाकळी नदीचे खोलीकरण करून देण्याची मागणीही त्यांनी आ. काळे यांना केली.
बाकळी नदीला निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे पूर येतो. या पुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यामुळेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची कुठलीही मदत देऊ नका; पण नदीचे खोलीकरण करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत निवेदनही देण्यात आले.