कृषी कार्यालयाला भुईमुगाच्या पिकाचे तोरण
By Admin | Updated: May 26, 2016 00:25 IST2016-05-26T00:25:53+5:302016-05-26T00:25:53+5:30
शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले.

कृषी कार्यालयाला भुईमुगाच्या पिकाचे तोरण
अंतोरा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन : चार दिवसांचा अल्टीमेटम
वर्धा : शेतकऱ्यांना कृषी विभागाने भुईमुगाचे बियाणे दिले. अन्य वाणाची मागणी होत असताना कृषी विभागाने भलतेच बियाणे दिले. या बियाण्यांची झाडे वाढली; पण चार महिने लोटूनही शेंगाच आल्या नाही. शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. यामुळे एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी बुधवारी अंतोरा येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला भुईमुगाच्या झाडांचे तोरण लावले.
शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून जानेवारी महिन्यात के ६ जातीचे भुईमूग बियाणे दिले. यात लोकवाटा १५०० रुपये भरून ३० किलो बियाणे दिले. पेरणीस १०० ते १२५ दिवसांचा कालावधी लोटूनही शेंगाच आल्या नाही. यामुळे चौकशी करून सात दिवसांत न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा आष्टी तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशाराही देण्यात आला. चनशेट्टी यांना निवेदन देताना भाजयुमोचे बाळा जगताप, नितीन कपले, प्रशांत केचे, गजानन आंबेकर, राजेश ठाकरे, विनोद देशमुख, आकाश चौधरी, प्रशांत केचे, प्रशांत पांडे, अजय व नरेंद्र कोहळे, प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर केचे, बालू केचे, ठाकरे, तडस यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा एकरी २५ हजारांचा खर्च गेला वाया
कृषी विभागाकडून आष्टी तालुक्यातील १७० शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे देण्यात आले. हे बियाणे उगवले; पण पिकाचा कालावधी लोटूनही शेंगाच लागल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांचा एकरी २५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला. शिवाय पिकांचा कालावधीही निघून गेला असून आता खरीप हंगामाची तयार करावी लागणार आहे. यामुळे भरपाई देण्याची मागणी होत आहे.
रोजंदारी महिला कामगारांचे धरणे आंदोलन
कृषी विभागाच्या फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्रावर कार्यरत कामगार महिलांना नियमित कामे दिली जात नाही. शिवाय वेतनही वेळेवर दिले जात नाही. यामुळे महिलांनी सिटूच्या नेतृत्वात बुधवारी कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
कृषी विभाग वर्धा अंतर्गत तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म तसेच बिजगुणन केंद्रावर १९८२ ते एप्रिल २०१६ पर्यंत सलग ३० ते ३४ वर्षांपासून रोजंदारी कामगार काही महिला कार्यरत होत्या. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जुन्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवले जाते.
संबंधित कामगार तालुका फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बिजगुणन केंद्र हे कार्यान्वित झाल्यापासून रोजंदारीवर कार्यरत होते. त्यांना प्रारंभी ४ रुपये प्रती दिवस रोज होता. आता १२० रुपयांप्रमाणे मजुरी दिली जात आहे. नवीन निर्णयानुसार ती वाढून १७० रुपये करण्यात आली. याबाबत कृषी विभागाशी चर्चा होऊनही अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.
या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.