पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

By Admin | Updated: June 19, 2014 00:11 IST2014-06-19T00:11:48+5:302014-06-19T00:11:48+5:30

शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी

Crop insurance; For the first time Wardha is included | पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

हवामानाचा आधार : बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी करा
वर्धा : शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक उल्हास नाडे आदी उपस्थित होते.
सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी केल्यानंतरच सर्व विक्रेत्यांनी बियाण्यांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केले़ अतिवृष्टी व पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन बियाण्यांवर विपरित परिणाम झाला़ यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे व उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे़ बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदी करताना दुकानदारांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासली आहे वा नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करताना प्रत्येक लॉटमधील बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच विक्री करावी़ सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी कापसासह इतर पिकांनाही प्राधान्य द्यावे़ उगवण क्षमता असलेले बियाणे खरेदी करावी. असेही जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी यावेळी सांगितले.
पीक विमा योजनेचा लाभ घ्या
महाराष्ट्र शासनाने हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे़ सोयाबीन व कापूस पिकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ३० जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले़ कापूस व सोयाबीन पिकाकरिता वर्धा जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ यात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस यापासून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना वर्धा जिल्ह्यातील सर्व गावांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची राहणार आहे़ पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी १ हजार २४५ रुपये तर सोयाबीन पिकासाठी ७१४.४० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे़ तेवढीच रक्कम शासन अदा करणार आहे़ पीक विम्याच्या संरक्षणात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस झाल्यास नुकसानीबाबत पिकांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Crop insurance; For the first time Wardha is included