अवकाळी पावसाचा २,१९८ हेक्टरवर पिकांना फटका
By Admin | Updated: March 1, 2016 01:28 IST2016-03-01T01:28:51+5:302016-03-01T01:28:51+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.

अवकाळी पावसाचा २,१९८ हेक्टरवर पिकांना फटका
सोमवारीही पावसाचा जोर : काही भागात गारपिटीसह पाऊस
वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसासोबत गारपीट झाल्याने त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यात शेतात काढणीच्या प्रतीक्षेत असलेला गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सुमारे २ हजार १९८ हेक्टरवर पिकांना फटका बसला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आलेल्या या पावसाचा फटका एकूण ७९ गावांना बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यात असून येथील ३२ गावांना त्याचा फटका बसला तर दुसऱ्या क्रमांकावर देवळी तालुका असून यातील २२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा महसूल व कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला. यात ३३ टक्क्यांच्या आत व ३३ टक्क्यांच्यावर अशी दोन श्रेणी करण्यात आली. यात पहिल्या श्रेणीत १ हजार ९६२ हेक्टरवर तर दुसऱ्या श्रेणीत २३६ हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नुकसान दोन दिवसातील आहे. जिल्ह्यातील पावसामुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे.(प्रतिनिधी)
पुलगाव - नाचणगाव परिसरात गारपीट
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस सोमवारीही तसाच असल्याचे दिसून आले. यात पुलगाव व नाचणगाव परिसरात सायंकाळी पावसासह गारपीट झाली. तर समुद्रपूर परिसरातील गिरड येथे पावसाने हजेरी लावली. येथेही पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर सेवाग्राम येथे रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे नुकसान झाले. या भागातील आसगाव येथील विद्यूत पुरवठा रात्रीपासून खंडीत झाला तो रात्री उशिराही सुरू झाला नव्हता.