शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 16:59 IST2017-09-17T16:55:13+5:302017-09-17T16:59:14+5:30
१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.

शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार
श्रेया केने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : १९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.
आज या संस्थेची वार्षिक उलाढाल २६ कोटींच्या घरात आहे. १८० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला असून दिवसाला १० हजार लीटर दूध उत्पादित केले जाते. यापैकी ४ हजार लीटर कच्च्या दुधाची विक्री करुन उर्वरीत दुधापासून विविध उत्पादन संस्था परिसरात तयार करतात. येथे स्वच्छता ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो.
गोरस भंडार संस्थेकडून दुग्ध उत्पादनासह दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. यात गोरसपाक, पेढे, बासुंदी, श्रीखंड व विविध बेकरी उत्पादनांचा समावेश आहे. गोरसपाक हे एक प्रकारची ‘कुकीज’ असून वैशिष्टपूर्ण चवीमुळे गोरसपाकची महती भारताबाहेर पोहचली आहे. विदेशात राहणाºया नातेवाईकांकडून आलेल्या खास मागणीमुळे गोरसपाक विदेशात पोहचला. याशिवाय पुणे, मुंबई, दिल्ली येथील आप्तेष्टांसाठी गोरसपाक हा ‘खाऊ’ म्हणून नेल्या जातो. वर्धेत आल्यावर राजकीय नेत्यांनाही ‘गोरसपाक’ हा चाखायचा असतोच.
आमचे प्रत्येक उत्पादन शंभर टक्के शुद्ध असावे यावर आमचा भर असतो. देशी गायीची संख्या रोडावत असून याकरिता प्रशासनाने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज आहे. शेतकºयांना सबसिडीवर पशुआहार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
माधव कडू, व्यवस्थापक, गो दुग्ध उत्पादक सहकारी संघ, वर्धा.