शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट
By Admin | Updated: July 2, 2014 23:24 IST2014-07-02T23:24:54+5:302014-07-02T23:24:54+5:30
बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते

शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट
पिंपळखुटा: बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते पीक पेरावे याचा विचार शेतकरी करीत असून दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे.
गत वर्षी २५ मे ते २५ जून या काळात १८ दिवस सतत पाऊस आला. मात्र यावर्षी यारदम्यान केवळ २ दिवस पाऊस आला. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची यंदाही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पाऊस येणार या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सोयाबीनची वेळ निघून गेली असून कपाशीची वेळही निघून जात आहे. त्यामुळे आता कोणते पीक पेरावे या विवंचनेत शेतकरी आहे.
ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पिकाला जीवदान दिले. मात्र इतरांचे बियाणे अजूनही माती आड आहे. किमान ६५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे कृषी विभाग सांगत असला तरी आधीच लांबलेली पेरणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता केली. यंदा सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले भाव व बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढविले होते. मात्र पाऊस लांबल्याने पुन्हा काय पेरावे या विचारात शेतकरी आहे.
गत वर्षी पावसामुळे खराब झालेल्या जनावरांचा चारा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता. नाईलाजाने जनावरांना तो चारा खावा लागला. परंतु पावसाच्या विलंबामुळे नवीन चारा उगवण्या आधीच गोठ्यातील चारा संपल्याने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जनावरांना कसे जगावावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक टंचाईत असलेला शेतकरी जनावरांकरिता चारा विकत घेवू शकत नाही. त्याकरिता शासनाने शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पावसाच्या विलंबाचा मजुरांनाही फटका बसला आहे. शेतीचे काम बंद असल्यामुळे मजूर सध्या घरीच असल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)