सिलिंडर वितरकाची ग्रा़पं़ सदस्यास मारहाण
By Admin | Updated: September 18, 2014 00:01 IST2014-09-18T00:01:40+5:302014-09-18T00:01:40+5:30
ग्राहकांना सदोष सेवा पुरविणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकाला जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामस्थांसमोर गॅस एजन्सी मालकाने बेदम मारहाण केली़ ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या

सिलिंडर वितरकाची ग्रा़पं़ सदस्यास मारहाण
केळझर बंद : आरोपीस अटक करण्याची मागणी
केळझर : ग्राहकांना सदोष सेवा पुरविणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकाला जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामस्थांसमोर गॅस एजन्सी मालकाने बेदम मारहाण केली़ ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी दि. १७ सप्टेंबरला येथे बंद पाळण्यात आला़ यामुळे शहरातील संपूर्ण दुकाने बंद होती़
सिंदी (रे.) येथील श्री जी गॅस एजन्सीकडून केळझर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. गत काही वर्षांपासून गॅस ग्राहकांकडून निर्धारीत किमतीपेक्षा अधिक पैसे उकळले जात होते. सिलिंडरची घरपोच सेवा न देणे, वेळी-अवेळी सिलिंडरची गाडी पाठविणे, गॅस भरलेल्या सिलिंडरचे वजन करून न देणे आदी गैरव्यवहारांबाबत ग्रा़पं़ सदस्य सुरेंद्र ठाकरे यांनी सिंदी (रे.) येथील रितेश पालीवाल यांना जाब विचारणे सुरू केले होते.
मंगळवारी गावात सिलिंडरने भरलेली गाडी आली़ यावेळी सुरेंद्र ठाकरे यांनी सिलिंडरचे वजन करून मागितले; पण गाडीत वजनकाटा नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले़ यावरून ठाकरे यांनी एजन्सी मालकास भ्रमणध्वनीवर स्पष्टीकरण मागितले़ याचा राग धरून रितेश पालीवाल साथीदारांसह गावात आला़ ठाकरे यांच्या घरासमोर कुणाला काही कळण्यापूर्वीच ग्रामस्थांसमोर ठाकरे यांना बेदम मारहाण केली. यात मध्यस्थी करणाऱ्या ग्रामस्थांनाही त्याने मारहाण केली़ शेवटी संयम सुटलेल्या ग्रामस्थांनी आरोपी पालीवाल यास चोप देत सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मात्र रात्री उशीरा आरोपी रितेश पालिवाल यास सोडून दिले. ग्रामस्थांनी बंद पाळून याचा निषेध नोंदविला़(वार्ताहर)