तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
By Admin | Updated: October 26, 2016 00:56 IST2016-10-26T00:56:31+5:302016-10-26T00:56:31+5:30
पिपरी (मेघे) येथील महानुभव पंथीय आश्रमात दत्तक दिलेल्या तपस्विनी ‘माधुरी’ हिने आत्महत्या केली.

तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
तपस्विनी आत्महत्या प्रकरण : महिलांच्या आंदोलनानंतर चौकशीला वेग
वर्धा : पिपरी (मेघे) येथील महानुभव पंथीय आश्रमात दत्तक दिलेल्या तपस्विनी ‘माधुरी’ हिने आत्महत्या केली. तीने आत्महत्या केली नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या भागातील महिलांनी केला होता. याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली तरी त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करीत या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामुळेच की काय, आतापर्यंत चालढकर करणाऱ्या रामनगर पोलिसांनी या प्रकरणात मंगळवारी दुपारी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यात एका महिलेसह दोन पुरूषांचा समावेश आहे.
यात शशिकला धुरमुसे, अक्षय नानाजी धुरमुसे व पंडीत डोमाजी चेके सर्व रा. पिपरी (मेघे) या तिघांवर भादंविच्या कलम ३०६, १७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी एकालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
माधुरी गोमेराज आंबेकर (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे. २९ सप्टेंबर रोजी ती घरी एकटी असताना तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी तिच्या पालकांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. याचवेळी परिसरातील तिघांनी माधुरीला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता, असे असताना रामनगर पोलिसांकडून या प्रकरणाकडे चालढकल करण्यात आली. दरम्यान मृतक माधुरीच्या पालकांनी याची माहिती परिसरातील महिलांना दिली. या महिलांनी परिसरात चौकशी केली असता माधुरीला खरच मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी एकत्र येत या प्रकरणात मृतकाला न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात या महिलांनी एकत्र येत रामनगर पोलिसांना या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी प्रकरणाला २० दिवस लोटले तरी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे पिपरी परिसरातील महिलांनी एकत्र येत सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची माहिती निवेदनातून दिली. महिलांनी निवेदन देताच त्यांच्याकडून मंगळवारी तक्रारीत नाव असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात रामनगर पोलिसांनी आरोपींना अटक करून शासन करावे, अशी मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
घरात शिरून केली माधुरीला मारहाण
माधुरी गोमेराज आंबेकर (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती तीन वर्षांची असतानाच तिला महानुभाव पंथीय प्रचारक चंद्रकला यांनी दत्तक घेतले होते. चंद्रकला यांच्या निधनानंतर तिचा सांभाळ चंद्रकला यांची बहीण आशाबाई सुंदराबाई लासुरकर या करीत होत्या. आशाबाई २९ सप्टेंबरला धर्मप्रचारासाठी बाहेर पडल्या असता माधुरी घरी एकटीच होती. यावेळी परिसरातील काहींनी घरात शिरून तिला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला; पण ती कशीबशी सुटली. तिला बेशुद्धावस्थेत सोडून मारेकऱ्यांनी पळ काढला. सायंकाळी ५ वाजता आशाबाई घरी आल्यावर घराचे दार आतून बंद होते. तेव्हा नागरिकांनी आशाबाईला हकिकत सांगितली. दार तोडल्यावर माधुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती.