अपंग व्यक्तींचा रेकॉर्ड नव्याने तयार करा
By Admin | Updated: July 18, 2014 00:17 IST2014-07-18T00:17:12+5:302014-07-18T00:17:12+5:30
गावातील अपंग बांधवांची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेऊन अपंगांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राप्त ३ टक्के निधी खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़

अपंग व्यक्तींचा रेकॉर्ड नव्याने तयार करा
निवेदन सादर : संघटना आंदोलनाच्या तयारीत
सेलू : गावातील अपंग बांधवांची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेऊन अपंगांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राप्त ३ टक्के निधी खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने केली आहे़ अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला़ याबाबत गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांना निवेदन सादर करण्यात आले़
अपंगांच्या न्याय्य मागण्यांबाबत संघटनेच्यावतीने अपंगाचे एक शिष्टमंडळ गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. या निवेदनाची दखल घेत आपल्या प्रलंबित मागण्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ. शबाना मोकाशी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. अपंगाची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतला घेण्याबाबत ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासनातर्फे सप्टेंबर २०१३ मध्ये आदेश पारित करण्यात आले; पण आदेशानंतरही अपंगांची नोंद ग्रा़पं़ मध्ये घेण्यास टाळाटाळ केली जात आहे़ यासाठी अपंगांना ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत़ ग्रा़पं़ कार्यालय सदर निधी राखीव ठेवत आहे वा नाही, याबाबतही माहिती दिली जात नाही़
अपंग बांधवांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पाचे ३ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना तो खर्च केला जात नाही. शासनाचा हा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी शिल्लक राहतो़ अद्यापही हा निधी अखर्चित आहे. याची दखल घेत शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून अपंग बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली़ सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोकाशी यांना निवेदन सादर करताना प्रहार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील मिश्रा, संजय धोंगडे, प्रफूल नरानिया, वामन चौधरी, नरेश खोडके, संजय वांदिले, सुधाकर गांजरे, महेंद्र भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)