जनसमस्यांसाठी माकपचा मोर्चा
By Admin | Updated: March 2, 2015 00:17 IST2015-03-02T00:17:51+5:302015-03-02T00:17:51+5:30
राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व म़रा़ शेतमजूर युनियन (लालबावटा) ...

जनसमस्यांसाठी माकपचा मोर्चा
वर्धा : राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व म़रा़ शेतमजूर युनियन (लालबावटा) तालुका कमिटीद्वारे तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़
सामान्य नागरिकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे. शिधापत्रिकेवर महिन्याकाठी ५ लिटर रॉकेल देण्यात यावे़ गॅस सिलिंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न करता पूर्ववत स्वस्त भावात गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, आवश्यक बेघर नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तालुक्यात मनरेगाद्वारे मागेल तेव्हा कामे देण्यात यावी अन्यथा बेरोजगार भत्ता द्यावा, मजुरांना थकित वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी व तहसीलदार आष्टी यांना देण्यात आले.
बाजार चौकातून निघालेला मोर्चाने प्रारंभी पंचायत समितीवर धडक दिली़ यावेळी गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले़ सदर समस्या त्वरित निकाली काढाव्यात, अशी मागणीही करण्यात आली़ या समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला़
यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला़ यावेळी निदर्शने करण्यात आली. राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सदर मागण्यांबाबत शासनाकडे विनाविलंब पाठपुरावा करावा, अशी मागणीही माकपने केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली़
यावेळी झालेल्या सभेला यशवंत झाडे, महेश दुबे, दिलीप शापा मोहन व संजय भगत यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी मोदी सरकारच्या अच्छे दिन कल्पनेवर ताशेरे ओढले़ हे सरकार अदानी, अंबानीसाठी अच्छे दिन आणत असून महागाई, राशन आदी गंभीर समस्यांच्या माध्यमातून जनतेसाठी बुरे दिन घेऊन येत आहे़ यामुळे या जनताविरोधी धोरणाचा कष्टकरी वर्गाने एकत्र येऊन विरोध करणे गरजेचे झाले आहे, असे मत मान्यवरांनी सभेत व्यक्त केले़
मोर्चामध्ये माकप तालुका सचिव संध्या संभे, अशोक कोहळे, राजकुमार राऊत, हरीष बागडे, राजेश चौधरी, रेखा ढबाले, मुकूंद कुरवाडे, रेखा धारस्कर, ज्योती गाडगे, शीला चौधरी, महेश शेंदरे, शंकर मानमोडे, राजू देशमुख, राजू चोपडे, निर्मला राऊत, बाळू नेहारे, सुधाकर बोरवारे, आशा गवळी, किसन सनेसर, सुरेश लांडगे आदी माकपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व एक हजारहून अधिक शेतमजूर, महिला-पुरूषांचा समावेश होता़(स्थानिक प्रतिनिधी)