गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय; पाच जणांना अटक
By Admin | Updated: October 30, 2014 22:55 IST2014-10-30T22:55:08+5:302014-10-30T22:55:08+5:30
गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात़ हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकीवात आहे़ बुधवारी (दि़२९) शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने केलेल्या

गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय; पाच जणांना अटक
तीन कासवांसह वाहने जप्त : आरोपी वनविभागाच्या स्वाधीन
वर्धा : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात़ हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकीवात आहे़ बुधवारी (दि़२९) शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने केलेल्या कारवाईत हे उघड झाले आहे़ बुधवारी पोलिसांनी गुप्तधन शोधणाऱ्या टोळीतील पाच जणांना तीन कासवांसह ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले़
गुप्तधन शोधणारी टोळी विदर्भात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर सक्रीय आहे़ या टोळीमार्फत विविध प्रकाराने गुप्त धन शोधून दिले जात असल्याचे दावे केले जातात़ यामुळे अनेक नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकतात़ या टोळीद्वारे कजली करणे, पायाळू माणसामार्फत शोध घेणे, बळी देणे, पांढरे घुबड वा २०-२१ नखे असलेल्या कासवांच्या माध्यमातून गुप्तधन शोधून दिले जात असल्याचा दावा केला जातो़ यासाठी सदर टोळीतील इसम पांढरे घुबड, कासव, पायाळू व्यक्तीही सोबत बाळगत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे़ अशाच एका टोळीला बुधवारी वर्धा पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने ताब्यात घेतले़ ही कारवाई शहरातील धुनिवाले मठ चौक परिसरात दुपारी ४़३० वाजताच्या सुमारास करण्यात आली़
धुनीवाले चौकात दोघे संशयित पिशवी घेऊन वावरत असल्याचे दिसून आले़ दरम्यान, एम.एच. ३१ सी़एम़ १८४ क्रमांकाच्या कॉलीस या वाहनात काही जण आले; पण पोलिसांना पाहताच ते घाबरले व त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा माग घेत त्यांना ताब्यात घेतले़ यात शंकर सावरकर रा. खापरी, उमेश बुराडे रा. खापरी, किसना बाळपांडे रा. कोंढाळी, सचिन सोनटक्के व गजानन साटोणे दोन्ही रा. काटोल या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन जिवंत कासव, एक दुचाकी, एक चार चाकी वाहन आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई मार्शल कमांडो पथकातील विकास राठोड, दिनेश चव्हाण व सहकाऱ्यांनी केली़
यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण पूढील चौकशी व कारवाईसाठी वन विभागाकडे वर्ग केले आहे़ या टोळीकडून मोठे रहस्य उलगडले जाण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे़ कासव हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यात शेड्यूल एकमध्ये समावेशित आहे़ यामुळे कासव बाळगणे, शिकार करणे वा व्यापार करणे गुन्हा आहे़
या प्रकरणात सात वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही वनविभागाद्वारे सांगण्यात आले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)