शेतकऱ्यांची तूर सोडून व्यापाऱ्यांच्या तुरीची मोजणी
By Admin | Updated: February 27, 2017 00:29 IST2017-02-27T00:29:37+5:302017-02-27T00:29:37+5:30
गेटपास घेवून क्रमवारीनुसार पहिले तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीची मोजमाप करण्याऐवजी नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी

शेतकऱ्यांची तूर सोडून व्यापाऱ्यांच्या तुरीची मोजणी
पुलगाव बाजारात नाफेडच्या तूर खरेदीवरून वादंग
पुलगाव : गेटपास घेवून क्रमवारीनुसार पहिले तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीची मोजमाप करण्याऐवजी नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी तूर घेवून आलेल्या एका व्यापाऱ्याच्या तुरीची मोजणी रविवारी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावरून पुलगाव बाजार समितीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. झालेल्या या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार केली. यावरून समितीचे सचीव आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांसमक्ष या प्रकाराचा पंचनामा केला असून झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले.
परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांची तूर नाफेडला विकण्याकरिता बाजारात आणली. मात्र नियमांची बतावणी करून नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप न करता त्याचे ढिग समितीच्या आवारात लावून ठेवले. शेतकऱ्यांना तुरीला चाळणी मारण्याकरिता वेळ नसल्याचे सांगण्यात आले. अशातच शनिवारी एका व्यापाऱ्याची तूर बाजार समितीत आली. यात नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी क्रमवारीनुसार पूर्वी आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्याऐवजी शनिवारी आलेल्या व्यापाऱ्याच्या तुरीचे मोजमाप केले. याची माहिती येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी आक्षेप घेतला.
या प्रकाराची माहिती देण्याकरिता त्यांनी थेट बाजार समितीच्या सभापतींचे कार्यालय गाठले. यावरून सभापतींनी झालेल्या प्रकाराचा पंचनामा करण्याच्या सूचना सचिव आणि संचालक मंडळाला दिल्या. पंचनामा करण्याकरिता मंडळ येथे पोहोचले असता तब्बल १३३ पोते तुरीची मोजणी होत असल्याचे दिसून आले. या तुरीच्या पोत्याचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती सचिवांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)
सुटीच्या दिवशी खरेदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयत नुकतीच सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची उपस्थिती होती. त्यांना शेतकऱ्यांचा शेतमाल सुटीच्या दिवशी बाजारात आला तरी त्याची खरेदी करा अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे रविवारी बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ असल्याचे चित्र होते.