कापसाला ६ हजार क्विंटलची प्रतीक्षा कायमच
By Admin | Updated: February 20, 2017 01:09 IST2017-02-20T01:09:41+5:302017-02-20T01:09:41+5:30
गतकाही दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी चर्चा जोरात होती; ...

कापसाला ६ हजार क्विंटलची प्रतीक्षा कायमच
अनेकांचा कापूस घरीच : बाजारातील दर ५,७०० ते ५,८०० रुपये क्विंटलच्या घरात
वर्धा : गतकाही दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी चर्चा जोरात होती; मात्र शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आता त्या काळापासून असलेला कापसाचा दर आजही कायम आहे. तो वाढण्याची चिन्हे बाजारात नाही. आज बाजारात ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपये क्विंटलच्या आसपास कापसाचा दर आहे. हा दर वाढताना दिसत नसून शेतकऱ्यांची सहा हजारावर दराची आशा सध्या तरी अपूर्णच आहे.
यंदा पावसाने ऐन हंगामात दडी मारल्याने कापसाचे दर चांगले राहतील अशी अपेक्षा होती. ती काही अंशी खरी ठरली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांची यंदा भावाबाबत अधिक ओरड झाली नाही. कापूस उत्पादकांना मिळत असलेला दर बरा असल्याने त्यांनीही घरी कापूस ठेवण्याऐवजी तो बाजारात काढला. अशातच सरकीच्या दरात तेजी आल्याने मध्यंतरी काही काळ कापूस ५ हजार ९०० रुपयांवर पोहोचला; मात्र त्याउपर त्याचे दर जाण्याची चिन्हे नाहीत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढण्याचे संकेत नसल्याचे कृषी तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सध्या मिळत असलेले कापसाचे दर सरकीच्या भावावर आधारीत आहे. ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल की पडेल या बाबतही साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची कापसाला सहा हजार रुपये दराची प्रतीक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट बाजारात कापसाला आजच्या स्थितीत ५ हजार ७०० रुपयाच्या आसपास दर मिळत आहे. हिच स्थिती वर्धा, आर्वी, देवळी व सेलू येथील बाजार समितीत आहे. यामुळे कापसाची सहा हजारावर जाण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा सध्या तरी धुसरच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)
शासकीय खरेदी शुन्यच
बाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीचा अद्याप मुहूर्तही झाला नाही. कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी शुन्य असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
घराघरात कापसाच्या गंज्या
जिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रुपयांवर दर मिळतील अशी अपेक्षा आहे.
कापसाची कमी भावात विक्री
आष्टी (श.)- यावर्षी कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाची चणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. आष्टी तालुक्यात तळेगाव येथे एकमेव कापूस खरेदी केंद्र आहे. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्याला घरून कापूस विकतात. शेतकऱ्यांकडून घेतलेला ५,२०० ते ५,५०० रुपयात घेतलेला कापूस व्यापारी बाजारात ६ हजार ते ६,५०० रुपयांत विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे, शेतकऱ्यांनी हंगामाकरिता उसणे आणलेले पैसे देण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)