कपाशीचे क्षेत्र वाढण्याचे संकेत
By Admin | Updated: May 4, 2015 02:01 IST2015-05-04T02:01:46+5:302015-05-04T02:01:46+5:30
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा

कपाशीचे क्षेत्र वाढण्याचे संकेत
प्रशांत हेलोंडे वर्धा
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा जाळून वखरण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कृषी विभागही हंगामासाठी सज्ज झाला असून नियोजन करण्यात आले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या पेऱ्यात ११ हजार १२५ हेक्टरची वाढ होणार असल्याचे संकेत कृषी विभागाचा आराखडा देत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून वाढलेला सोयाबीनचा पेरा यंदा ११ हजार ५४३ हेक्टरचे घटणार असल्याचेही भाकीत कृषी विभागाने आराखड्यात केले आहे.
२०१४-१५ च्या खरीप हंगामामध्ये २ लाख २६ हजार ८७५ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १ लाख २१ हजार ५४३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली होती़ विलंबाने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हाती लागले नाही़ कपाशीचेही समाधानकारक उत्पादन झाले नाही; पण बहुतांश शेतकऱ्यांना कपाशीचा आधार मिळाला़ शिवाय भावही वाढले़ यामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार भाकीत वर्तविवले आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही ४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे़ यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमुंग, तूर, मुग, उडीद व तीळ या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे़ सर्वाधिक क्षेत्रात कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसारच बियाणे, खतांची मागणीही करण्यात आलेली आहे़ तुरीच्या पेरणीमध्येही यंदाच्या खरीप हंगामात वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ गतवर्षी जिल्ह्यात ५३ हजार ५७८ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली होती़ यंदाच्या नियोजनात ती ६५ हजार ६०० हेक्टरपर्यंत होईल, असा अंदाज आहे़ खरीपात एकूण क्षेत्रामध्ये ३,२४६़२७ मेट्रीक टन कापूस उत्पादनाचे लक्ष्य आहे़ गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली व कपाशीचे उत्पादनही घटले़ असे असले तरी यंदा कपाशीच्या पेऱ्यासाठी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे़ शिवाय अन्य पिकांचेही नियोजन करण्यात आले आहे़