जिल्ह्यात पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी
By Admin | Updated: November 22, 2015 02:13 IST2015-11-22T02:13:36+5:302015-11-22T02:13:36+5:30
शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे.

जिल्ह्यात पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी
रूपेश खैरी वर्धा
शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे. यात काही ठिकाणी पणन महासंघाचे व काही ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात शासकीय व व्यापाऱ्यांची मिळून आतापर्यंत एकूण ५ लाख ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण २ लाख ५० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रातून एकूण सुमारे १० लाख क्विंटल कपाशीचे उत्पादन होईल असे भाकीत कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी निम्मा कापूस बाजारपेठेत आल्याचे चित्र आहे. अजून निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या शेतातच आहे.
जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीतून जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या या बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधीकडून कापसाची खरेदी सुरू आहे. देवळी, समुद्रपूर व सिंदी बाजार समितीच्या आवारात सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवरून कापसाची खरेदी सुरू आहे. या तीन केंद्रवार एकूण ११ हजार ६३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. तर आर्वी बाजार समितीच्या खरांगणा व तळेगाव केंद्रावर तर कानगाव येथील केंद्रावर पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आहे.
बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा याकरिता सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात गत हंगामात सात ठिकाणी सीसीआच्यावतीने कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदा त्यांच्याकडून पाचच ठिकाणी कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देवळी, कांढळी व सिंदी येथे केंद्र सुरू झाले आहे. शिवाय वर्धा व हिंगणघाट येथे केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती सीसीआयच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात जाम व रोहणा केंद्राकरिता संबंधित बाजार समितीतून मागणी आली नसल्याने तेथील केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आहे.