उत्पादनाच्या घटीमुळे कापूस दरवाढीचे संकेत
By Admin | Updated: December 9, 2015 02:24 IST2015-12-09T02:24:34+5:302015-12-09T02:24:34+5:30
कापसाचे नेहमी होत असलेले उत्तम पीक, गत वर्षीच्या शिल्लक गाठी, परदेशातील घटत्या मागणीमुळे निर्यातीतील घट...

उत्पादनाच्या घटीमुळे कापूस दरवाढीचे संकेत
तज्ज्ञांचा अंदाज खुजा : सूत गिरणीची मागणी अधिक
फनिंद्र रघाटाटे रोहणा
कापसाचे नेहमी होत असलेले उत्तम पीक, गत वर्षीच्या शिल्लक गाठी, परदेशातील घटत्या मागणीमुळे निर्यातीतील घट व आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे कापसाच्या किमतीत सन १५-१६ च्या हंगामातही मंदी राहील, असा या कृषी क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या खरीपात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट वर्तविली जात आहे. होणाऱ्या उत्पादनातून देशातील सूतगिरण्यांची मागणीच पूर्ण होवू शकणार नसून कापसाच्या भावात तेजी येणे क्रमप्राप्त आहे, असे चित्र प्रत्यक्ष उत्पादनावरून दिसत आहे.
यावर्षी सोयाबीनच्या तुलनेत कापसाचा पेरा अधिक झाला. पेरण्या साधल्या, पाऊस कमी असूनही पऱ्हाटीच्या झाडांची वाढ पर्याप्त प्रमाणात झाली आहे. हे सर्व पाहून सप्टेंबर २०१५ मध्ये कृषी तज्ज्ञांनी संपूर्ण देशात ६२९ लक्ष क्विंटल उत्पादनातून देशात ३७० लक्ष गाठी तयार होतील. गत वर्षीच्या ३५ लाख गाठी शिल्लक आहेत. विक्रीसाठी ४०५ लक्ष कापूस गाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. देशातील एकूण सर्व सूतगिरण्यांना वर्षाकाठी ३२० ते ३२५ लक्ष गाठी लागतात. सदर मागणीचा विचार करता उत्पादन अधिक व मागणी कमी, असे चित्र अपेक्षित केले. इतर भागात मागणी कमी असल्याने निर्यातीला देखील वाव नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने आपला कापूस विकून मोकळे होण्याचा सल्ला तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला होता.
प्रत्यक्ष उत्पादनानुसार तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता आहे. अनेक कापूस उत्पादक भागात परतीचा व अवकाळी पाऊस न आल्याने ‘फरदड’ कापूस निघण्याची शक्यता मावळली आहे. कोरडवाहू जमिनीतील कापसाची डिसेंबर अखेर उलंगवाडी होणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे संकेत दिसत आहे. गत वर्षीच्या ३५ लक्ष शिल्लक गाठी विचारात घेता यावर्षी विक्रीसाठी ३०० लक्ष गाठी उपलब्ध होतील. त्यापेक्षा देशातील सूतगिरण्यांची मागणी जास्त आहे. प्रत्यक्ष उत्पादनानंतरची स्थिती लक्षात घेता यावर्षी भविष्यात कापसाच्या भावात तेजी येण्याचा संकेत मिळत आहे.